लाल मिरची झाली आणखी तिखट...फोडणार घाम 

file photo
file photo

नागपूर : झणझणीत भाजी आणि सावजी रस्सा म्हटले की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. यंदा मात्र टाळेबंदीमुळे देशांतर्गत मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीची चव तिखट झाली आहे. कळमना बाजारात 120 ते 130 तर किरकोळमध्ये 180 ते 190 रुपयांपर्यंत विकली जात आहे. लाल मिरचीला भाववाढीचा तडका लागला आहे. 

नियमित आहारात तिखटाचे महत्त्वाचे स्थान आहे. जेवण झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी मसाल्यासह तिखटाची गरज असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात महिलातर्फे लाल मिरची खरेदी करून वर्षभराचे तिखट तयार करण्याची परंपरा आहे. टाळेबंदीच्या काळात तयार तिखट खरेदी करून स्वयंपाकाची गरज अनेकांनी भागविली. टाळेबंदीमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रारंभीच्या काळात आवक झालीच नाही. आता मालवाहतुकीची परवानगी दिल्याने मिरचीची आवक वाढली असली तरी भाव चढेच आहेत. 

कळमना बाजार आठवड्यात केवळ सोमवारीच मिरचीची आवक होते. गेल्या सोमवारी बाजारात जवळपास 16 हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्येक पोते हे 30 ते 40 किलोंचे असते. सर्वाधिक आवक आंध्र प्रदेशातून होत असली तरी ती यंदा कमीच आहे. येथील शेतकऱ्यांनी मिरची कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली आहे. या राज्यात जवळपास 60 लाख पोती कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली आहेत. लॉकडाउन पूर्णपणे हटल्यानंतर आवक वाढेल, त्यानंतरच भाव कमी होतील अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मागणी वाढल्याने भाव कडाडले आहे. 

लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात होते. त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. आंध्र प्रदेशात मिरचीचे कोल्ड स्टोरेज सर्वांत जास्त आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन होणाऱ्या लाल मिरचीची चव वेगवेगळी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मिरचीचा रंग लाल व चमकदार, मध्यम तिखट असते. कर्नाटकातील बेडगी भागात उत्पादन होणारी मिरचीचा रंग भडक, सौम्य तिखट असते. त्यामुळे या मिरचीला हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. 

  
कळमन्यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचे भाव 140 ते 150 रुपयांदरम्यान आहेत. गेल्या वर्षी भाव 120 ते 125 रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी गुंटूर मिरचीचे भाव 160 ते 165 रुपयांवर पोहोचले होते. पण आता कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील सिरोंचा मिरचीचे भाव 120 ते 125, राजुरा मिरची 125 ते 130 रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कळमन्यात मिरचीची आवक कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी राज्याराज्यांतून परस्पर खरेदी सुरू केल्याने कळमन्यातील व्यापार कमी झाला आहे. मिरचीची निर्यात मलेशिया, चीन, श्रीलंका, थायलॅंड, सौदी अरब आणि अन्य देशांत होते. 
-संजय वाधवानी, मिरची व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com