शौचालयातील पाईपच्या मदतीने मेडिकलमधून पळाला कैदी 

Prisoner escapes from medical hospital
Prisoner escapes from medical hospital

नागपूर : मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रामा केअरमध्ये बनलेल्या कोवीड सेंटरमधून उपचार घेत असलेला कुख्यात कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. नरेश अनकालू महिलांगे (२५, पुंजारामवाडी, गल्ली क्र. १०, कळमना) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ७ नोव्हेंबरला हुडकेश्‍वर ठाण्याच्या डीबी पथकाने मध्यवर्ती कारागृहातून प्रॉडक्शन वारंटवर ताब्यात घेतले होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. नरेशला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला मेडिकलमध्ये कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. 

त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी गार्ड ड्युटीवर पोलिस हवालदार अरुण पाटील आणि कर्मचारी राजेंद्र लेंडे यांना तैनात करण्यात आले होते. नरेशला कोरोना असल्यामुळे त्याला विशेष वाॅर्डात ठेवण्यात आले होते. पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते.
 

पोलिसांना दिला गुंगारा

कैदी नरेश याने मेडिकलमधून पळून जाण्याचा प्लान तयार केला. पोलिसांना संभ्रमात टाकण्यासाठी तो रात्रीतून चारदा शौचास गेला आणि परत आला. शेवटी पाचव्यांदा तो शौचालयात गेला आणि खिडकीतून पाइपच्या मदतीने तो खाली उतरला आणि फरार झाला. तोपर्यंत पोलिस त्याची शौचालयातून परत येण्याची वाट पाहत होते, अशी माहिती आहे.

कैदी कुख्यात चोर

सूत्रांच्या माहितीनुसार, नरेश महिलांगे हा कुख्यात चोर आहे. त्याच्यावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. एका चोरीच्या गुन्ह्यात तपास करण्यासाठी हुडकेश्‍वर पोलिसांना त्याला मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले होते. तो पळून गेल्यानंतर पुन्हा चोरी करू शकते.

पोलिसांत गांभीर्यच नाही 

मेडिकलमधून आरोपी किंवा कैदी पळून जाण्याच्या घटना नागपुरात नवीन नाहीत. यापूर्वीही अनेकदा कैदी मेडिकलमधून पळून गेले आहेत. कैद्यांच्या सुरक्षेबाबत पोलिस गंभीर नसल्यामुळे अशा घटना घडतात. पोलिस अधिकारीसुध्दा दोषी कर्मचाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करीत असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतात. 

संपादन  : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com