मेडिकलमधून कुख्यात कैदी फरार; पोलिस दलात खळबळ; शोधासाठी पथके तैनात

अनिल कांबळे 
Sunday, 18 October 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास अली याने वर्धा येथे एका व्यक्तीचा खून केला होता. त्या हत्याकांडात तो नोव्हेंबर २०१९ पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद होता.

नागपूर ः वर्धा येथील हत्याकांडातील कुख्यात आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मेडिकलमधून फरार झाला. ही घटना आज रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. लगेच त्याच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आले. बंबईया उर्फ अब्बास इकबाल अली (२७, रा. ताजबाग, नागपूर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास अली याने वर्धा येथे एका व्यक्तीचा खून केला होता. त्या हत्याकांडात तो नोव्हेंबर २०१९ पासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद होता. त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला सुरक्षारक्षकांनी कारागृहातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

जाणून घ्या - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

तेथे उपचार केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले होते. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास पोलिस पथकाने अब्बासला मेडिकलला नेले. दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला.

 काही वेळानंतर आरोपी दिसत नसल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले आणि हॉस्पिटलमध्ये शोधाशोध केली. मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याची माहिती मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

घटनेचे गांभीर्य नाही

मेडिकल आणि पोलिसांच्या ताब्यातून अनेकदा आरोपी पळून गेले आहेत. पोलिसांना अशा घटना गंभीर वाटत नाहीत. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाल्याच्या घटनांची थातूरमातूर चौकशी लावण्यात येते. तपास अधिकारी आपले ‘हात ओले’ करून घेतात. त्यानंतर ‘जैसे थे’ अशी स्थिती असते. ‘कुछ नही होता’ अशी भावना असल्यामुळे पोलिस कुख्यात कैद्यांनाही गांभीर्याने घेत नाहीत, अशी चर्चा आहे .

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner ran away from medical hospital at nagpur