घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

मंगेश वनीकर
Saturday, 17 October 2020

आगीत दुकान मालक सुनील पितलिया, त्यांची पत्नी कोमल पितलिया, मुलगी रिया जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आग विझवतांना सिलिंडरचा स्फोट झाल्याने अग्निशामन दलाचे दोन जवान जखमी झाले.

हिंगणघाट (जि. वर्धा)  : येथील जगन्नाथ वॉर्डातील वर्धमान टेक्‍स्टाईल्स या होलसेल रेडिमेड कापड दुकान आणि दुकानाच्या पहिल्या माळ्यावरील निवासस्थानाला आग लागली. ही घटना शनिवारी (ता. 17) पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली. यात 50 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीत दुकान मालक सुनील पितलिया, त्यांची पत्नी कोमल पितलिया, मुलगी रिया जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आग विझवतांना सिलिंडरचा स्फोट झाल्याने अग्निशामन दलाचे दोन जवान जखमी झाले. आग विझविण्यासाठी मदतीला धावून आलेला युवक चेतन फुटाने हाही या आगीत जखमी झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

सुनील पितलिया यांचे मुख्य मार्गावर वर्धमान टेक्‍स्टाईल्स हे कापड दुकान आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर त्यांचे निवासस्थान आहे. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात रेडिमेड कापड साहित्य होते. आग लागल्याने धूर पहिल्या व दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचला. आगीमुळे घरातील वातावरणात उष्ण झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले. त्यांना पहिल्या माळ्यावर आगीचे लोळ दिसल्याने कुटुंबातील सदस्यांनी जीव वाचविण्यासाठी पहिल्या माळ्यावरील बाल्कनीतून टिनाच्या शेडवर उड्या मारल्या व खाली सुखरूप उतरले. 

परंतु, आगीचे चटके लागल्याने ते काही प्रमाणात जखमी झाले. दरम्यान आगीचे लोळ दिसू लागल्याने शेजारीही जागे झाले. त्यांनी लगेच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन यंत्रणा तेथे दाखल झाली व त्यांनी आग नियंत्रणात आणली. तत्पूर्वी दुकानातील व घरातील संपूर्ण साहित्य खाक झाले. दरम्यान आग विझविताना सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशामन दलाचे नितीन जंगले व गणेश सायंकार हे दोन जवान जखमी झाले. त्यांनाही उपचाराकरिता सेवाग्राम येथे दाखल करण्यात आलेले आहे..

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

मिलन मॉलच्या आगीच्या घटनेची पुनरावृत्ती

शहरात वर्षभरापूर्वी महावीर भवन चौकातील विजय मुथा यांच्या मिलन मॉलला याच पद्धतीने आग लागली होती. या आगीत वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. तर विजय मुथा हे जखमी झाले होते. या घटनेत सुद्धा मॉलच्या पहिल्या माळ्यावर निवासस्थान असलेल्या मुथा कुटुंबीयांनी खाली उड्या टाकून जीव वाचविला होता. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज घडली. आजच्या घटनेत सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in shop at Hinganghat wardha district