खाजगी रुग्णालयांना मोकळे रान; मनपा अधिकाऱ्यांच्याच खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट; महापालिकेचे नियंत्रण सुटले

Private hospitals are giving extra bills to corona patients
Private hospitals are giving extra bills to corona patients

नागपूर:  शहरातील खाजगी हॉस्पिटल्सकडून रुग्णांच्या लुटीचे प्रकार सर्रास सुरू आहे. महापालिकेच्याच आरोग्य अधिकाऱ्यांच्या खाजगी हॉस्पिटलने एका रुग्णाकडून अवाजवी बिल वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी रुग्णाच्या हितचिंतकाला दिलेल्या सल्ल्यामुळे लुटीचा प्रयत्न फसला. मात्र, यानिमित्त पालिकेच्याच यंत्रणेचा फज्जा उडविणारे अधिकारी अन् सामान्यांची लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्सचा बुरखा फाटला.

कोरोनाग्रस्तांच्या उपचारावरून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाजगी हॉस्पिटलविरुद्ध कठोर पाऊले उचलली. त्यांनी खाजगी हॉस्पिटलची कानउघडणीच केली नाही, तर अनेकांची अवाजवी बिले कमी करण्याचेही निर्देशही खाजगी हॉस्पिटलला दिले. त्यांच्या कारवाईच्या धाकामुळे ती बिले कमीही झाली. 

मुंढे यांची बदली झाल्यानंतर खाजगी रुग्णालयांना सामान्यांची लूट करण्यासाठी मोकळे रानच उपलब्ध झाल्याचे धंतोली येथील कोलंबिया हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या लुटीच्या प्रयत्नामुळे पुढे आले. कोलंबिया हॉस्पिटलमध्ये महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांची भागीदारी असल्याचे समजते. याबाबत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात आरोपही केले होते. डॉ. गंटावार यांच्यावर सभागृहात पुराव्यासह अनेक आरोप झाले होते. त्यामुळे सभागृहाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईचे आदेशही दिले होते. 

आरोग्य अधिकाऱ्यांच्याच रुग्णालयात लुटीचा प्रकार 

पालिकेने खाजगी रुग्णालयांकडून होणारी लूट रोखण्यासंदर्भात बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नियुक्त केले. पालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून याची जाणीव डॉ. गंटावार यांनाही आहे. त्यांच्याच रुग्णालयात हा लुटीचा प्रकार पुढे आला. तिवारी यांनीच सोशल मीडियावर अवाजवी बिल आणि नंतर देण्यात आलेल्या दुसऱ्या बिलाची प्रत व्हायरल करून लुटीच्या प्रयत्नाचा प्रकार पुढे आणला.

खाजगी हॉस्पिटलकडून लुटीचा गोरखधंदा

कोरोनाच्या उपचारासाठी अंजिरा जुमळे कोलंबिया हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या होत्या. उपचारानंतर १ लाख ८० हजारांचे बिल काढण्यात आले. रुग्णांच्या संबंधितांनी तिवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पालिकेच्या ऑडिटरकडून बिलाचे ऑडिट करण्याचा सल्ला दिला. ही बाब रुग्णालय व्यवस्थापनाला समजताच त्यांनी तत्काळ बिल कमी केले. १ लाख ८० हजारांचे बिल रद्द करून ४० हजारांचे बिल दिले. यातूनच एका रुग्णाची दीड लाखाने होणारी लूट थांबली. खाजगी हॉस्पिटलकडून लुटीचा गोरखधंदा जोमाने सुरू असल्याचे शहरात चित्र असून महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे.

धंतोली स्थित कोलंबिया हॉस्पिटलमध्‍ये रुग्णाकडून उपचाराचे अवाजवी पैसे वसूल केले जात असल्याबाबत एका कार्यकर्त्याचा फोन आला. त्याला महापालिकेच्या ऑडिटरकडून बिल तपासण्याचा सल्ला दिला. ही बाब कशीतरी रुग्णालय व्यवस्थापनापर्यंत पोहोचली. त्यांनी १ लाख ८० हजारांचे बिल रद्द करून ४० हजारांचे नवे बिल दिले.
- दयाशंकर तिवारी, 
ज्येष्ठ नगरसेवक. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com