धक्कादायक! पीएसआयच वापरतो चक्क चोरीची बाईक; दुचाकी मालकाला केली होती पैशांची मागणी

अनिल कांबळे
Thursday, 15 October 2020

काही सहकाऱ्यांनी दुचाकी पोलिस ठाण्यात जमा करून स्वतःची सुटका करून घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने अधिकारी असल्याचे सांगून इतरांवर दबाव आणला. या चोरीच्या प्रकाराची पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे.

नागपूर : गुन्हे शाखेचा एक पोलिस उपनिरीक्षकच चोरीची मोपेड वापर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चोरीच्या प्रकाराची पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरातून एका विद्यार्थ्याने ॲक्टिवा चोरून नागपुरात आली. तो चोरटा युवक नागपुरात शिक्षण घेत होता. तसेच चोरीची दुचाकी वापरत होता. गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या पथकाने त्या युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याने पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे त्याला खाक्या दाखवताच त्याने औरंगाबादमधील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

हेही वाचा - हॉटेल घेता का हॉटेल! झळकू लागले फलक

त्यानंतर एका पीएसआयने ती दुचाकी गुन्हे शाखेच्या युनिट कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात जमा न करता थेट घरी नेली. चोरीच्या दुचाकीने तो अधिकारी अनेकदा ड्युटीवर यायला लागला. ही बाब पीएसआय पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. काही सहकाऱ्यांनी दुचाकी पोलिस ठाण्यात जमा करून स्वतःची सुटका करून घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने अधिकारी असल्याचे सांगून इतरांवर दबाव आणला. या चोरीच्या प्रकाराची पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे.

दुचाकी मालकाला पाठवले परत

चोरीची दुचाकी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पीएसआयने दुचाकीच्या मालकाला दिली. त्यानुसार तो पीएसआयला भेटायला नागपुरात आला. त्याने दुचाकीच्या बदल्यात काही पैशाची मागणी केली. मात्र, तेवढी रक्‍कम देण्यास नकार दिला. त्यामुळे पीएसआयनेही दुचाकी परत देण्यात नकार देत हाकलून लावल्याची चर्चा आहे. त्या अधिकाऱ्याने नंबर प्लेटमधील एक अक्षर ब्लेडने खोडल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

सत्यता पडताळून पाहिली जाईल
गुन्हे शाखेचा कुणी अधिकारी चोरीची दुचाकी वापरतो याची खात्री करावी लागेल. त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. जर कुणी दोषी आढळल्यास आम्ही कुणाचीही खैर करणार नाही.
- सुनील फुलारी,
अतिरिक्त आयुक्त, गुन्हे शाखा

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PSI uses a very stolen bike