मोठी बातमी... नागपुरात पुन्हा जनता कर्फ्यू, जीवनावश्यक सेवा वगळता या दिवशी सारेकाही बंद

Public curfew again in Nagpur
Public curfew again in Nagpur

नागपूर : कोरोनाचे संक्रमण काही केल्या आटोक्यात येत नाहिये. बाधित आणि मरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज नागपुरात कोरोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यात दररोज होणारे मृत्यू आणि बाधितांची वाढती संख्या धक्कादायक आहे. त्यामुळे आता काही नागरिकांकडूनच लाॅकडाउनची मागणी होत आहे. त्यामुळे प्रशासनानेही बैठक घेत  जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला.   
 
शहरात लॉकडाऊन करायचे की नाही, याबद्दल विविध मतप्रवाह आहेत. बुधवारी महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या कक्षात झालेल्या महत्वाच्या बैठकीत पुढील दोन आठवडे शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

महापौर जोशी म्हणाले, शहरात जनता कर्फ्यू लावण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत शहरातील आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, आयुक्त, तिन्ही अतिरिक्त आयुक्त या सर्वांनी कोरोनाचे वाढते संक्रमण, झपाट्याने वाढत चाललेली मरणाऱ्यांची संख्या आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयांवर चर्चा केली. या बैठकीतही लॉकडाऊन लावायचा की नाही, यासंदर्भात विभिन्न मतप्रवाह पुढे आले. संक्रमण सतत वाढत असताना लॉकडाऊन केले तर ते योग्य होणार नाही. कारण त्यामुळे अडचणी वाढतील, असे आयुक्तांचे मत पडले. लोकप्रतिनिधींही त्यावर आपले म्हणणे मांडले.

चर्चेअंती शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कर्फ्यू  ३० सप्टेंबरपर्यंत, म्हणजे येणाऱ्या दोन शनिवार आणि रविवारी राहणार आहे. हा जनता कर्फ्यू पुढील बैठक घेऊन पुन्हा वाढवायचा आहे. यापुढील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लावायचा, असा निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे. यासोबत रुग्णवाहिका आणि शववाहिकांची स्थिती काय आहे, हे जाणून घेऊन रुग्णवाहिका वाढविण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. एम.जी. एम.एस. झालेले ३४१ डॉक्टर्स महानगरपालिकेच्या सेवेत लवकरच रुजू होणार असल्याचेही महापौर जोशी यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत शासकीय आणि खासगी रुग्णालयांत बेड्स उपलब्ध होत नाही. पण ३४१ नवीन डॉक्टर्स उपलब्ध झाल्यामुळे मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे रुग्णालयात येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. त्या-त्या रुग्णालयांत या डॉक्टरांची सेवा घेतली जाणार असल्याची सकारात्मक बाब आजच्या बैठकीतून समोर आली. कोविड रुग्णांना न स्वीकारणाऱ्या शहरातील ६३७ नोंदणीकृत खासगी रुग्णालयांना नोटीस देणे सुरू झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या खासगी रुग्णालयांमध्येही बेड्स उपलब्ध होतील, अशी आशा महापौर जोशी यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

संपादन : अतुल मेहेरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com