केवळ धास्तीच की खरेच कुठे पाणी मुरते आहे?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

केंद्रीय रॅगींग समितीला 2018-19 च्या शैक्षणिक सत्रात मेडिकलमध्ये रॅगींग झाल्याची एक निनावी तक्रार मिळाली होती. त्यात काही वरिष्ठ विद्यार्थ्यांचे नावही अधोरेखित करण्यात आले होते. परंतु ऍन्टी रॅगींग समितीच्या चौकशीत एकाही विद्यार्थ्याने रॅगींग झाल्याची कबूली दिलेली नाही.

नागपूर : येथील मेडिकलमधील वसतिगृह क्रमांक चार मध्ये विद्यार्थ्यांचे रॅगींग झाल्याची निनावी तक्रार केंद्रीय रॅगींग समितीला मिळाल्याने प्रशासनात खळबळ उडाली. मात्र, विद्यार्थ्यांना विचारणा केल्यानंतर सगळ्यांनी एक लेखी निवेदन देऊन असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे कळवले. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असला तरी निनावी तक्रार करणारा कोण याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार अहवाल केंद्रीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - पुजा मिथुन जोडीला नागपुरात रंगेहात अटक, कोण आहे ही जोडी?

केंद्रीय रॅगींग समितीला 2018-19 च्या शैक्षणिक सत्रात मेडिकलमध्ये रॅगींग झाल्याची एक निनावी तक्रार मिळाली होती. त्यात काही वरिष्ठ विद्यार्थ्यांचे नावही अधोरेखित करण्यात आले होते. परंतु ऍन्टी रॅगींग समितीच्या चौकशीत एकाही विद्यार्थ्याने रॅगींग झाल्याची कबूली दिलेली नाही. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावरही त्यांनी लेखी स्वरूपात रॅगींग झाले नसल्याचे प्रशासनाला कळवले. हा अहवाल केंद्रीय समितीला पाठवल्यावर हे प्रकरण निवळले. आता 2019-20 या शैक्षणिक सत्रातही एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे रॅगींग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगींग समितीकडे निनावी स्वरुपात प्राप्त झालेली आहे. त्यात बरेच आरोप करण्यात आले आहेत. त्याची समितीने तातडीने दखल घेऊन वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यासह एमबीबीएस प्रथमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. कुणीही रॅगींग झाल्याचे कबूल करीत नव्हते. विद्यार्थ्यांनी रॅगींग झाले नसल्याचे लेखी स्वरुपातही दिले आहे. या विषयावर शनिवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या अध्यक्षतेत ऍन्टी रॅगींग समितीच्या बैठकीत चर्चाही झाली. शेवटी केंद्रीय समितीने येथे रॅगींग झाले नसल्याचा अहवाल पाठवण्यावर शिक्कामोर्तब केले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raging in nagpur medicle college! is it true?