
परीक्षेसंदर्भात माहिती देत पुन्हा फार्म भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यावरून अनेक जण सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी पैसे उकळल्याची माहिती आहे.
नागपूर : देशभरात रेल्वे विभागात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. एनटीपीसी (ग्रुप सी) पदासाठी टप्प्याटप्प्याने परीक्षा घेणे सुरू आहेत. देशभरातील कोरोनाची स्थितीतही रेल्वे विभागाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांनी परीक्षेबाबत परीक्षार्थ्यांना लिंक आणि ईमेल पाठवून गंडविने सुरू केले आहे. या जाळ्यात आतापर्यंत राज्यातील अनेक जण अडकले आहेत. त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम उडविण्यात आल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागात ‘ग्रुप सी’मध्ये एनटीपीसी पदासाठी भरती सुरू आहे. या भरतीत शिक्षणाची अट फक्त दहावी पास ठेवण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातून लाखो बेरोजगार तरुण-तरुणींनी अर्ज भरले. दीड वर्षांपासून रेल्वे बोर्डाच्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहणे सुरू होते. मात्र, कोवीडमुळे परीक्षा होऊ शकली नाही.
अधिक वाचा - रुग्णालयात सफाईसाठी गेला कर्मचारी; शौचालयाच्या सीटमध्ये सळाख टाकताच बाहेर आले मृत अर्भक
जानेवारीपासून टप्याटप्याने ही परीक्षा होत आहे. देशभरात हजारो केंद्रावर उमेदवार परीक्षा देत आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असल्यामुळे कॉल लेटर, परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ आणि परीक्षेबाबत इतर माहितीसुद्धा इमेल आणि मोबाईलवर पाठविण्यात येते. याच संधीचा फायदा सायबर क्रिमिनल्सनी घेतला आहे.
रेल्वेचा अर्ज भरणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना मोबाईलवर लिंक, एसएमएस आणि इमेल पाठवणे सुरू केले आहे. त्या ईमेलमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅंग होणे किंवा व्हायरस घुसविण्यात येत आहे. तसेच परीक्षेसंदर्भात माहिती देत पुन्हा फार्म भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यावरून अनेक जण सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी पैसे उकळल्याची माहिती आहे.
बेरोजगार असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात जेमतेम पैसे असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना डल्ला मारल्यानंतर त्यांच्या हाती फारसे काही लागत नाहीत. त्यामुळे अनेक जण तक्रार करण्यास धजावत नाहीत. तसेच कुणाच्या खात्यात पैसेसुद्धा नसतात. त्यामुळे पोलिसांपर्यंत तक्रारी येत नाहीत.
जाणून घ्या - पतीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार
एसएमएस किवा ईमेल पाठवू शकतात
सायबर गुन्हेगार बॅंक खात्याची माहिती घेण्यासाठी लिंक, एसएमएस किवा ईमेल पाठवू शकतात. ते फेक ईमेल असतात. अशा लिंकवर कुणीही क्लिक करू नये. तसेच गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकू नये. जर कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी थेट सायबर क्राईममध्ये तक्रार करावी.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, (सायबर क्राईम)