विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर

passport photo
passport photo

नागपूर : एखाद्या कमकुवत संघाला पराभूत केल्यास तुमचे कुणी फारसे कौतुक करत नाही. मात्र, रथीमहारथींचा समावेश असलेल्या संघाला पाणी पाजले तर त्याची निश्‍चितच चर्चा होते. असाच एक पराक्रम विदर्भ रणजी संघाने 1992-93 च्या मोसमात बलाढ्य रेल्वेविरुद्ध केला होता. रेल्वे संघाला 165 धावांनी नमवून विदर्भाने आपली ताकद दाखवून दिली. विदर्भाच्या त्या अनपेक्षित विजयाची क्रिकेट वर्तुळात सर्वत्र चर्चा झाली होती. 


दिल्लीच्या कर्नेलसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चारदिवसीय सामन्यात रेल्वेचा संघ टॅलेंट, अनुभव, कामगिरी सर्वच बाबतीत विदर्भापेक्षा उजवा होता. त्यामुळे विदर्भाला सहज पराभूत करू शकतो, अशा आविर्भावात सुरुवातीपासूनच रेल्वेचे खेळाडू वावरत होते. दुर्दैवाने हा फाजिल आत्मविश्‍वासच त्यांना नडला. कर्णधार प्रवीण हिंगणीकर यांच्या नेतृत्वात खेळलेल्या विदर्भ संघात व्यावसायिक खेळाडू सुलक्षण कुळकर्णी, हेमंत वसू, समीर गुजर, योगेश घारे, उस्मान गनी, मनोज गोगटे, प्रीतम गंधे, राजेश गावंडे, ट्रॅव्हर गोन्साल्विस, हर्षद हुद्दारसारखे युवा व अनुभवी खेळाडू होते. तर, देशभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या रेल्वे संघातही अभय शर्मा, युसूफ अली खान, के. भरतन, मानविंदरसिंग, एम. मजिठिया, के. शर्मा, इकबाल ठाकूरसारखे "मॅचविनर्स' होते.

कडाक्‍याच्या थंडीत झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने कुळकर्णी (91 धावा) व कर्णधार हिंगणीकर (52 धावा) यांची अर्धशतके व तळातील प्रीतम गंधेंच्या 46 बहुमूल्य धावांच्या बळावर पहिल्या डावात 352 धावा केल्या. विदर्भाच्या गोलंदाजांनी आपली जबाबदारी प्रभावीरित्या पार पाडत रेल्वेचा डाव 277 धावांत गुंडाळला. विदर्भाला 75 धावांची निर्णायक आघाडी मिळवून देण्यात गोन्साल्विस (चार बळी) व गंधे (तीन बळी) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विदर्भाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, रेल्वेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक होऊन विदर्भाची 180 धावांतच दाणादाण उडविली. केवळ कुळकर्णी (67 धावा) व हिंगणीकर (43 धावा) हे दोनच फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे तीन दिवसपर्यंत विदर्भाच्या मुठ्‌ठीत असलेला सामना निसटणार की काय, अशी भीती साऱ्यांनाच वाटू लागली होती. 

हिंगणीकर, गंधेंनी दिली सामन्याला कलाटणी 


रेल्वेकडे असलेले दर्जेदार फलंदाज बघता 256 धावांचे विजयी लक्ष्य मुळीच आवाक्‍याबाहेरचे नव्हते. मात्र, रेल्वेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमितपणे गडी बाद करत रेल्वेचा दुसरा डाव अवघ्या 80 धावांत गुंडाळून 165 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. अष्टपैलू हिंगणीकर यांनी सर्वाधिक पाच आणि गंधे यांनी चार गडी बाद करून सामन्याला कलाटणी दिली. वैदर्भी खेळाडूंच्या एकजूटतेचे प्रतीक ठरलेल्या त्या विजयाची अनेकांनी स्तुती केली. त्याचवेळी विदर्भाला कमी लेखल्याची चूक रेल्वेच्या खेळाडूंना कळून चुकली. रेल्वेसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणे, हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे कर्णधार हिंगणीकर यांनीही बोलून दाखविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com