esakal | जुलैमध्ये सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस; तरीही नागपूरकरांची तहान भागणार, वाचा कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Rainfall twelfth percent below average in July

विभागात आत्तापर्यंत ५५.५९ टक्के जलसाठा आहे. गत वर्षी याच तारखेला हा आकडा केवळ २१.७४ टक्के इतकाच होता. अमरावती विभागातही स्थिती समाधानकारक आहे. या विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत (१३.१२ टक्के) या वेळी ४७.७ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. 

जुलैमध्ये सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस; तरीही नागपूरकरांची तहान भागणार, वाचा कारण...

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : दमदार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलै महिण्यात विदर्भात यावर्षी सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे. विदर्भात ४७७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ४२२ मिलिमीटर पाऊस पडला. नागपूर जिल्ह्यातही सरासरीपेक्षा चार टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तरीही नागपूरकरांची तहाण भागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. ती कशी वाचा सविस्तर... 

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात चौराई धरण बांधल्याने गेल्या वर्षी तोतलाडोह धरण भरले नव्हते. त्यामुळे नागपूरकरांना उन्हाळ्यात पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सर्वांत मोठे पेंच नदीवरील तोतलाडोह धरण आतापर्यंत ८४.१३ टक्के भरले आहे. नागपूरकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. धरणाची सध्याची स्थिती लक्षात घेता पुढील दोन वर्षे पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात नागपुरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही.

हेही वाचा - हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...

गत वर्षी आणि आतार्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे नागपूर व अमरावती विभागातील बहुतांश मध्यम व मोठे धरणे काठोकाठ भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांची सध्याची स्थिती लक्षात घेता पुढील वर्षीही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची फारशी समस्या जाणवणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सिंचन विभागाने तसे संकेत दिले आहेत. 

विभागात आत्तापर्यंत ५५.५९ टक्के जलसाठा आहे. गत वर्षी याच तारखेला हा आकडा केवळ २१.७४ टक्के इतकाच होता. अमरावती विभागातही स्थिती समाधानकारक आहे. या विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत (१३.१२ टक्के) या वेळी ४७.७ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. 

धरण जलसाठा (टक्के) 

तोतलाडोह ८४.१३
गोसीखुर्द ४८.७१
बावनथडी ३०.६९
इरई ६०.८९
चौराई ६९.०० 
अप्पर वर्धा ७७.९९
लोअर वर्धा ७१.५२
बोर ५५.५२
इटियाडोह २५.९४
कामठी खैरी ७४.८९
काटेपूर्णा ८६.५१ 

 सर्वांत कमी पाऊस गोंदिया जिल्ह्यात

दमदार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुलैत विदर्भात या वर्षी सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. विदर्भात सर्वांत कमी पाऊस गोंदिया जिल्ह्यात (४५ टक्के) झाला. वाशीम (२५ टक्के) आणि बुलडाणा (१८ टक्के) जिल्ह्यांनी मात्र सरासरी पार केली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाचे दोन महिने अद्याप शिल्लक असल्याने तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी - 'घरी रहा, सुरक्षित रहा' या मानसिकतेतून बाहेर पडा..राज्यात मोठया पदावर असणाऱ्या व्यक्तीचे विधान.. वाचा सविस्तर...

विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या विदर्भ व मध्य प्रदेशात ढगांची दाटी झाली आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा खरा ठरवत वरुणराजाने रविवारी शहरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह जवळपास अर्धा तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. विदर्भात आणखी दोन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे. नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे