तळीरामांनी शोधले अखेर "ओपन बार'; कुठे बसतात "ते'...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

लॉकडाउन काळात दारूची दुकाने बंद होती. आता बार बंद ठेवून दारू दुकानांना परवानगी तर दिली मग "बैठक' कुठे करावी? तळीरामांनी सुपर मार्केटमधील दुकाने बंद झाली की, त्या दुकानांसमोरच "ओपन बार' सुरू केले. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी ठाणेदार दिलीप ठाकूर यांच्यासह या "ओपन बार'वर छापा मारून तळीरामांची "झिंग' उतरविली.

रामटेक (जि.नागपूर) : न.प.चे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, ठाणेदार दिलीप ठाकूर व सहकारी, न.प.चे विभागप्रमुख व सहकारी यांनी सुपर मार्केटच्या बंद असलेल्या दुकानांसमोर "ओपन बार' उघडून बसलेल्या मद्यपींना मद्यपान करताना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा : सावधान... सापांसोबत स्टंट केल्यास गुन्हा

असे तयार केले"ओपन बार'
दारू दुकानांमधून दारू विकत घेऊन ती दुकाने बंद झाल्यानंतर त्या दुकानांसमोर थाटात बसून ही मंडळी आपली पिण्याची हौस भागवत होती. अकरा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात अशी अनेक ठिकाणे या मद्यपींनी हेरून ठेवलेली आहेत. नगर परिषदेचे नेहरू मैदान तर वर्षभर "ओपन बार' म्हणूनच अनेक मद्यपी वापरतात. मद्यपान केल्यानंतर ही मंडळी काचेच्या बाटल्या फोडून त्याचे काच मैदानावरच टाकून देतात. नगर परिषदेचे हे एकमेव क्रीडा मैदान आहे. शहरातील लहान-मोठी सर्वच वयाचे मुले या मैदानावर खेळताना दिसतात. त्यांना सुरुवातीला मैदानावर काच गोळा करून ते मैदानाबाहेर फेकल्यानंतरच खेळणे सुरू करावे लागते. विशेष म्हणजे हे मैदान न. प.कडून तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाला भाडेपट्टीवर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या मैदानावर विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जिल्हांतर्गत विविध वयोगटांतील मुलामुलींचे सामने आयोजित केले जातात.

आनंदाची बातमी: भूमीपुत्रांच्या रोजगाराचा पुनश्‍च हरिओम

पिनेवाले अपने लिए वाजिब जगह ढूँढ लेते हैं...
रविवारी आठवडीबाजारही येथेच भरवला जातो. आठवडीबाजार येथून हलवावा यासाठी खेळाडूंनी, क्रीडा संघटनांनी अनेकदा न. प.कडे पाठपुरावा केला. मात्र, काही राजकीय पक्षांची मंडळी न. प.ला तसे करण्यास विरोध करतात. आता मद्यपींनी आणखी एक शक्कल लढविली आहे. नेहरू चौक, सुपर मार्केट परिसरात काही इमारतींवर यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रात्री कोणी नसल्याचे पाहून ही मंडळी या बंद इमारतींच्या छतावरदेखील आता "ओपन बार' लावू लागली आहेत. आता न. प. व पोलिस प्रशासन किती आणि कोणत्या ठिकाणी लक्ष देईल, हादेखील प्रश्नच आहे. शेवटी "कोई कुछ भी करें, पिनेवाले अपने लिए वाजिब जगह ढूँढ ही लेते हैं'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ramtek, the chief minister hit drinkar