
सोयाबीन तेल किरकोळ बाजारात पुन्हा १३५ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. वायदा बाजारात अचानक वाढ झाल्याने बाजारात हरभऱ्याच्या दरात प्रति क्लिंटल ३०० रुपयाची वाढ झालेली आहे.
नागपूर : इंधनाच्या दरात विक्रमी भाववाढ झालेली असताना दुसरीकडे खाद्य तेल, हरभरा डाळीच्या दराचा आलेखही सतत चढाच आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झालेली आहे. घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचा १५ किलोच्या डब्बामागे १०० ते १२५ रुपयाची वाढ झाल्याने पुन्हा दोन हजार रुपयाचा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल किरकोळ बाजारात पुन्हा १३५ ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. वायदा बाजारात अचानक वाढ झाल्याने बाजारात हरभऱ्याच्या दरात प्रति क्लिंटल ३०० रुपयाची वाढ झालेली आहे.
महिन्याचा अखेरचा आठवडा असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. वायदा बाजारात हरभऱ्याचे भाव अचानक वाढल्याने हरभरा डाळीच्या दरात वाढ झालेली आहे. हरभऱ्या दर वाढीचे कारण किमान आधारभूत किमतीत झालेली वृद्धी आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनही कमी झालेले आहे.
हेही वाचा - "मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा...
पुढील काही दिवसात होळीच्या सणानिमित्त हरभरा डाळीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरभरा आणि हरभरा डाळीच्या दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा हरभऱ्याचे उत्पादन ९०ते ९५ लाख टन होण्याची शक्यता आहे. हरभऱ्याचे भाव वाढलेले असल्याने डाळीच्या दरातही वाढ झालेली आहे.
मसुरीचे भाव वाढल्याने मसुरीच्या डाळीचे भाव वधारले आहे. चांगल्या प्रतीच्या गव्हाचे भावही वाढलेले आहेत. तांदुळाच्या दरात भाववाढ झालेली आहे. ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी असून त्याचे भाव आता प्रति १५ किलो डब्बा दोन हजारावर पोहोचले आहे. सोयाबीनसोबतच सनफ्लावर तेल २१५०-२२००, पामोलिन तेल १९३०-१९५० आणि राईस ब्रान तेलाचे भाव १९७०-२००० रुपये प्रति १५ किलो डब्बा पोहोचले आहे
नक्की वाचा - गृह विभागाकडूनच पोलिसांवर अन्याय; जुन्याच आदेशाने पदोन्नती, दीडशेवर अधिकारी वंचित
विदेशात पाम, सोयाबीन आणि सनफ्लावर तेल वाढलेले आहेत. विदेशात या तेलाचे भाव वाढल्याने देशांतर्गत तेलाच्या दरातही भाववाढ झालेली आहे. शेंगदाणे तेलाच्या दरातही २४०० रुपये प्रति १५ किलोवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसात सरसोची नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर खाद्य तेलाचे भाव घसरण्याची शक्यता आहे असे नागपूर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ