कांदा, बटाटा तडकला; लाभ व्यापाऱ्यांना; शेतकऱ्यांचे माप रितेच

rates of potatos and onions are high
rates of potatos and onions are high

अमरावती, ः कांदा व बटाट्याची नियमित आवक नसल्याने दोन्हींचे भाव चांगलेच तडकले आहेत. नाशिकच्या बाजारात कांद्याचा लिलाव सुरू झाला असला तरी अद्याप तो अमरावतीच्या बाजारात पोहोचला नाही. दक्षिण भारतात पावसामुळे बटाटा पाण्याखाली गेल्याने राज्यात आवक कमी झाली असून त्याचेही भाव तडकले आहेत. पन्नास रूपयांपलीकडे बटाट्याचे भाव गेले आहेत.

सद्या दोन्हींचे भाव पन्नाशीवर आहेत. भाज्यांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा कांद्याच्या भावात चांगली तेजी आहे. मात्र या भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. ग्राहकांची ओरड असली तरी तो भोजनातील मुख्य असल्याने चढे दर असतानाही नाक मुरडत का होईना खरेदी केल्या जातो. त्याचा लाभ दलाल व मोठ्या खरेदीदारांच्या पथ्यावर पडत आहे.

 येथील बाजार समितीत दररोज वीस ट्रक कांद्याची आवक होते. हा कांदा प्रामुख्याने नगर, नाशिक, बुलडाणा येथून काही प्रमाणात येतो. मात्र परतीच्या पावसाने नाशिक, बुलडाणा येथील कांद्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक त्यामुळे मंदावली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. 

स्थानिक बाजार समितीत आठवड्यातून एक दिवस आवक होऊ लागली आहे. त्यामुळे ठोक बाजारात कांद्याच्या भावात दरवाढ झाली असून चांगल्या दर्जाचा कांदा साठ रुपये किलोने विकल्या जात आहे. किरकोळ बाजारात त्यामुळे आणखी दरवाढ आहे. लिलाव बंद असल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी बाजार समितीमधील खरेदीदारांच्या मते सद्या बाजारात येत असलेला कांदा लिलावापुर्वी खरेदी करण्यात आला आहे. 

त्यामुळे त्याचा लिलाव बंद राहाण्याशी काही संबंध नाही. मात्र या कारणांचा लाभ उचलत दर चढविण्यात आले आहेत. आगामी काही दिवसांत नव्या कांद्याची आवक होणार असून भाव घसरतील असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

कांद्यापाठोपाठ बटाट्याचेही भाव चांगलेच तडकले आहेत. किरकोळ बाजारात बटाटा पन्नास रुपये किलोने विकल्या जात आहे. दक्षिण भारतात परतीच्या पावसामुळे नवा बटाटा पाण्यात गेला. त्यामुळे त्याची आवक मंदावली. गतवर्षी बटाट्याचे उत्पादन अधिक झाल्याने भाव घसरले होते. यंदा उत्पादनच कमी घेण्यात आल्याने बाजारात आवक कमी आहे. ठोक बाजारात तीस रुपये किलोचा बटाटा किरकोळ बाजारात पन्नाशीवर आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com