सापांना पकडण्याचे धाडस करायचे आहे? आधी हे करा... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

समाजात आपण शूर असल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपला जीव धोक्‍यात टाकत असतात. योग्य प्रशिक्षण नाही, स्थानिक सापांची योग्य माहिती नाही, त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांना अनेकदा सर्पदंश झाल्याच्या घटना निदर्शनात येत असतात. या स्वयंघोषित सर्पमित्रांमुळे खऱ्या सर्पमित्रांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

नागपूर : स्वयंघोषित सर्पमित्र साप पकडल्यानंतर त्याच्याशी खेळतात. सार्वजनिक ठिकाणी बाटलीत बंद असलेल्या सापाला नेऊन प्रदर्शन मांडतात. साप पकडल्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करतात. या स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश लावण्याची गरज आहे. 

अनधिकत सर्पमित्रांचा सुळसुळाट सर्वत्र पाहायला मिळतो. साप पकडण्याच्या धाडसी कामाचे प्रदर्शन दाखविण्यात अनेक स्वयंघोषित सर्पमित्र फुशारक्‍या मारत फिरताना दिसतात. गल्लोगल्लीत सर्पमित्र तयार झाल्याचे दिसत आहे. कुठल्याही सापाची माहिती नसताना त्याला चुकीच्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करतात. साप पकडताना लोखंडी सळाख, आरीचे पाते, लाकूड यासारख्या वस्तूंचा वापर करणारे हे स्वयंघोषित सर्पमित्र सापाला वाचवितात की त्याला इजा पोहोचवितात, असा प्रश्‍न निर्माण होतो. 

तसेच ते समाजात आपण शूर असल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपला जीव धोक्‍यात टाकत असतात. योग्य प्रशिक्षण नाही, स्थानिक सापांची योग्य माहिती नाही, त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांना अनेकदा सर्पदंश झाल्याच्या घटना निदर्शनात येत असतात. या स्वयंघोषित सर्पमित्रांमुळे खऱ्या सर्पमित्रांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. स्वयंघोषित सर्पमित्र साप पकडल्यानंतर त्याचा दुरुपयोग किंवा प्रदर्शन मांडण्याच्या घटना जगजाहीर आहेत. मात्र, विषारी सापांना पकडून, त्यांचे विष काढून ते विकण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

सर्पमित्र म्हणून सापाला पकडण्याचे धाडस करायचे असेल तर प्रथम स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 20 जून आहे. नोंदणी न करता साप पकडण्याचे धाडस केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा : सव्वादोन लाख रुपये वीजबिल पाहून लागला 'करंट' 

पावसाळा सुरू झाल्यामुळे साप बाहेर निघण्याचे प्रकार वाढणार आहेत. अशा वेळी नागरिकांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर साप पकडण्यासाठी संबंधित व्यक्तींना पाचारण केले जाते. मात्र, बरेचदा अशा व्यक्तींना यासंदर्भात अपुरे ज्ञान असते. यामुळे दुर्घटना घडतात. तसेच सापाला पकडून ठेवणे, उपाशी ठेवणे, त्याचे प्रदर्शन करणे यांसारखे अनुचित प्रकार घडतात. 

वन विभागाने पुढाकार घेत नोंदणी करणाऱ्या सर्पमित्रांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वी साप पकडले असल्यास त्याची नोंद वन विभागाकडे आहे का? पालकांनी साप पकडण्यासाठी मान्यता दिल्याचे लेखी पत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्रासह सेमिनरी हिल्स येथे उपस्थित राहून सर्पमित्रांनी आपल्या नावाची नोंद या मुदतीत करून घ्यावी. 
-डॉ. प्रभुनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration of snake friends begins