Video : नातेवाईक मृतदेहाच्या प्रतीक्षेत, दुसरीकडे पोलिसांनी टाकले पुरून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

आमच्याकडे जो मृतदेह दिला तो पुरला, तो बेवारस आहे की, कोणाचा नातेवाईक हे ठाऊक नसल्याचे पोलिस म्हणाले. 

नागपूर : नुकतेच नागपूरच्या जयभीमनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर महापालिकेच्या शववाहिकेने मृतदेह मेडिकलमध्ये पोहोचवला, परंतु ही महिला कोरोनाबाधित नसतानाही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मृतक महिलेच्या मुलीसह नातेवाइकाला अंतिम दर्शन घेऊ न देता या मृतदेहाला स्मशानभूमीत पुरण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. 

विशेष असे की आईचा मृतदेह आता मिळेल थोड्यावेळात मिळेल या प्रतीक्षेत ही अभागी मुलगी शवगारासमोर सायंकाळी 6 वाजेपर्यंत नातेवाइकांसह प्रतीक्षा करीत होती, तर दुसरीकडे पोलिसांनी हा मृतदेह दुपारीच स्मशानात पुरून टाकला. गुरुवारी दुपारपासूनच घरी अंत्यसंस्काराची सर्व तयारी करण्यात आली असून एखाद्या बेवारसासारखे दफन करण्यात आल्याने एकप्रकारे ही विटंबनाच असल्याची व्यथा मुलीने बोलून दाखवली.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच! 

दरम्यान, रात्री पोलिसांनी पुरलेला मृतदेह उकरून काढला. यानंतर 10 वाजता मृतदेहाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. दक्षिण नागपुरातील जयभीमनगर येथील ही घटना. ललिता गणपत पानतावणे ( 70) असे या मृतक महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. जयभीमनगर हे कंटोन्मेट झोनमध्ये असल्याने येथील परिसरात होणाऱ्या प्रत्येक मृतकाची कोरोना चाचणी होणे बंधनकारक आहे.

शेतीविषयक मार्गदर्शनाचा नवा फंडा! घुमवा एक फोन आणि विचारा शंका

मृत्यू झाल्याची माहिती पोहोचताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहावर ताबा मिळवला. काळजी घेत मेडिकलमध्ये पोहोचविण्यात आले. रीतसर पंचनामा करण्यात आला. दरम्यान, कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. मात्र, नमुन्याचा अहवाल येण्यापूर्वीच ललिता पानतावणे यांचा मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदन विभागाकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी दुपारीच हा मृतदेह मोक्षधाम घाटावर दफन केले. 

शवविच्छेदन गृह बंद झाल्यानंतर सत्य उघडकीस 
शवविच्छेदनगृह बंद होत असताना नातेवाइकांनी ललिता पानतावणे यांचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याचे सांगताच कुटुंबाच्या स्वाधीन भलताच मृतदेह सोपवण्यात येत होता. परंतु, हा मृतदेह आमचा नसल्याचे सांगताच पोलिसांच्या स्वाधीन दुपारी मृतदेह दफन करण्यासाठी पाठवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. कोरोनाबाधित नसल्यानंतरही घरातील सदस्याच्या स्वाधीन मृतदेह न करता पोलिसांच्या हाती मृतदेह कसा दिला? हा सवाल नातेवाइकांनी केला. यानंतर बेवारस समजून मृतदेह दिल्याचे पुढे आले. सारे नातेवाईक घाईगर्दीत मोक्षधाममध्ये पोचले. मात्र, येथे मृतदेह पुरला असल्याचे पुढे आले. पोलिस आणि नातेवाईक यांच्यात वादाला तोंड फुटले. नातेवाइकांनी दफन केलेला मृतदेह उकरून काढण्याची विनंती केली. 

अजनी पोलिसांच्या हद्दीतील मृतदेह सक्करदरा पोलिसांच्या हाती कसा? 
जयभीमनगर अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. पंचनाम्याची कारवाईदेखील अजनी पोलिसांनीच केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मात्र, हा मृतदेह सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. फ्रिझरमध्ये 8 व्या क्रमांकाच्या पेटीतील मृतदेह काढून आमच्याकडे दिला, आम्ही मोक्षधाम येथे आणले आणि दफन केले, असे मत सक्करदरा पोलिसांनी व्यक्त केले. आमच्याकडे जो मृतदेह दिला तो पुरला, तो बेवारस आहे की, कोणाचा नातेवाईक हे ठाऊक नसल्याचे पोलिस म्हणाले. 

झुबेदाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत 

ओल्ड एज होममध्ये झुबेदाचा मृत्यू झाला. या वृद्ध महिलेचे शव मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात आणले. सोबतच जयभीमनगर येथील महिलेचा मृतदेह होता. जयभीमनगरातील मृतदेह सक्करदरा पोलिसांच्या हाती दिला. तो पोलिसांनी तो पुरला. ओल्ड एज होम मधील महिलेचा मृतदेह मेडिकल मध्ये ठेवलेला आहे, झुबेदाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relatives waited for the dead body, on the other hand body buried by the police