नरखेडमध्ये अठ्ठावीस वर्षांनंतर कॉंग्रेसचे पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव आहे. बेलोना गट हा अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष त्या जागेवर होते.

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्ष हद्दपार तर तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर कॉंग्रेसचे पुनरागमन झाले. तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती जागांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने निर्विवाद कब्जा मिळविला. भाजपचा गड असलेल्या बेलोना जिल्हा परिषद जागेवर पहिल्यांदा राष्ट्रवादीने विजय मिळविला तर जलालखेडा जिल्हा परिषद जागा कॉंग्रेसने हस्तगत केली. भाजप व शिवसेनेच्या वाट्याला भोपळा आला. 

क्‍लिक करा:  गोल माल है भाई सब गोलमाल है 

जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव आहे. बेलोना गट हा अनुसूचित जाती महिलेकरिता राखीव होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष त्या जागेवर होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गटात सभा घेतली तरी स्थानिक पदाधिकारी ही जागा वाचविण्यास असमर्थ ठरले. गेली सात वर्षे नरखेड पंचायत समितीमध्ये शिवसेना व भाजपचे राज्य होते. तरी दोन्ही पक्ष पंचायत समितीची एकही जागा मिळवू शकले नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी भिष्णूर ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणुकीत पराभूत झालेले सतीश रेवतकर यांच्या पत्नी नीलिमा रेवतकर यावेळी निवडून आल्या. तसेच बंडू उमरकर याचे पुत्र मिथिलेश उमरकर यांनी आपल्या आईवडिलांच्या पराभवाचा वचपा मेंढला पंचायत समिती सर्कलमधून घेत विजय मिळविला. सावरगाव ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळविणाऱ्या भाजपला येथून पराजयाचा सामना करावा लागला. त्यामुळे माजी आमदार सुनील शिंदे यांचे सावरगावातील वर्चस्व या निवडणुकीने सिद्ध केले. या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख व माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली. 

क्‍लिक करा:  सांगा कसे जगायचे? आठ महिन्यांपासून खाण्याचेही वांधे 

फडणवीसांना नाकारले ! 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, खुद्द त्यांच्या नागपूर जिल्ह्यात, भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूर व विदर्भाच्या जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत उभे राहण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे. फडणवीसांच्या नेतृत्वातील राज्य सरकार व जिल्हा परिषदेमध्ये भाजपने त्यांच्या मागील पाच वर्षांच्या कारकीर्दीत जनतेच्या विरोधात अन्यायाची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. बेरोजगारीचा डोंगर उभा केला. ही परिस्थिती पाहता पुनश्‍च एकदा नागपूर व विदर्भ कॉंग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. 
डॉ. आशीष देशमुख 
माजी आमदार, काटोल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Return to Congress after twenty-eight years in Narkhed