गावात मरण झाल्यास येथील नागरिकांच्या जीवाचा उडतो थरकाप; मृतदेह स्मशानात नेताना होतात नरकयातना

संदीप गौरखेडे
Saturday, 24 October 2020

तालुक्यातील अडेगाव येथील स्मशानघाट एक किलोमीटर अंतरावर. मागील वर्षी जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाचा निधी खर्च करून स्मशानघाटावर जाण्यासाठी सिमेंट रस्ता बनविण्यात आला.

कोदामेंढी (जि. नागपूर) : माणसाच्या मरणानंतर शेवटचे स्थान म्हणजे स्मशानघाट. येथे रूढीप्रमाणे सोपस्कार पार पाडले जातात आणि मृत व्यक्तीला ‘अलविदा’ केले जाते. मात्र मरणानंतर शेवटची घटका जेथे पार पडते अशा स्मशानघाटामध्ये मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना नाना नरकयातना सोसाव्या लागत आहे.

तालुक्यातील अडेगाव येथील स्मशानघाट एक किलोमीटर अंतरावर. मागील वर्षी जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाचा निधी खर्च करून स्मशानघाटावर जाण्यासाठी सिमेंट रस्ता बनविण्यात आला. सिमेंट रस्ता बनला पण निधी अपुरा असल्याने अर्धवट. सिमेंट रस्ता म्हटले की रस्त्याचे आयुष्य पंचवीस ते तीस वर्ष असे समजल्या जाते. मात्र वर्षभऱ्यातच सिमेंट रस्त्याची गिट्टी उखडू लागली असून भेगा पडल्या. 

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने ही विदारकता हे सहज पचविण्यासारखे आहे. बांधकाम करताना स्थानिक प्रशासन कोणते सोंग घेऊन होता. त्याचबरोबर संबंधित विभागाचे तांत्रिक अधिकारी यांनी कंत्राटदाराला पाठबळ दिले तरच शक्य झाले हे सहज आहे. म्हणजेच स्मशानघाटातील विकास निधीत देखील खाण्याची नियत सोडत नसतील तर काय म्हणावे !

स्मशानघाटावरील अर्धवट रस्ता, शेड आणि सौदर्यीकरण याकरिता शासनाकडे पंधरा लाखाच्या निधीची मागणी केली असल्याचे ग्रामसेवक राजकुमार गजभिये सांगतात. स्मशानघाटावर मृतदेह नेताना काही अंतर कापल्यानांतर नरकयातना सुरु होतात. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने खांद्यावरील तीढीचा कधी तोल घसरेल याचा नेम नाही. रात्रीच्या सुमारास प्रेत स्मशानात कसे न्यावे, याचा अंदाज लावताच येत नाही. 

येथील स्मशानघाट रस्त्याची दुर्दशा याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ एकाने फेसबुकच्या पानावर टाकल्याने विषय चांगलाच रंगला. गावगाड्यात विरोध होऊ नये आणि कुणाची बदनामी होऊ नये म्हणून एखादा विषयावर अथवा समस्येवर पुढे सरसावून बोलण्याची हिंमत कुणी दाखवीत नाही, हेही विशेष.

अधिक वाचा - VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक

गुडघाभर चिखलात फसतो पाय  

पावसाळ्यात तर खूप विदारक स्थिती असते. गुडघाभर चिखल तुडवीत कसेबसे प्रेत स्मशानात नेले जाते. बैलाचा पाय चिखलात फसल्यास सरणाची लाकडे कधी घसरतील हेही सांगता येत नाही. स्मशानात प्रेत नेण्यासाठी ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागते. यावरून स्मशानात काय सुविधा असतील, हे दिसूनच येते. पुढील निधी आल्याशिवाय या रस्त्याची डागडुजी करण्याचे धाडस ग्रामपंचायत प्रशासन दाखविणार की नाही ?

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road towords cemetry is too bad to go for funeral