बस सुटल्याने बाप-लेकं बसले युवकाच्या कारमध्ये; वाटेत पिस्तूलच्या धाकावर घडला हा प्रकार

अनिल कांबळे
Sunday, 24 January 2021

वर्धा मार्गावरील हुळदगाव परिसरात कार थांबविली. बजाज व मुलाला कारमधून बाहेर उतरविले. एका युवकाने पिस्तूल बजाज यांच्या पोटाला लावली. पैशांची मागणी केली. त्यानंतर अन्य एका युवकाने बजाज यांच्याकडील सोन्याचे कडे, सोनसाखळी, अंगठी, मोबाईल व रोख हिसकावली.

नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर कापड व्यापारी व मुलाचे अपहरण करून सोन्याचे दागिने व रोख लुटून त्यांना सोडण्यात आले. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. प्रवीण प्रभूदास बजाज (वय ४०, रा. सिंधी कॉलनी, शंकर चौक, गोंदिया) असे व्यापाऱ्याचे नाव असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

बजाज यांचे गोंदिया येथे न्यू बजाज स्टोअर्स नावाचे कापडाचे दुकान आहे. कापड खरेदीसाठी २१ जानेवारीला बजाज व मुलगा नागपुरात आले. त्यांनी कापड खरेदी केले. रात्री ९ वाजताच्या सुमारास बजाज व मुलगा बसस्थानकावर गेले. पण, गोंदियाला जाणारी बस निघून गेली होती. याचदरम्यान एका युवक बसस्थानक परिसरात आला.

अधिक वाचा - बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा! हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

गोंदियाची सवारी आहे का अशी विचारणा केली. बजाज यांनी त्याला होकार दिला. युवक बजाज व मुलाला घेऊन बसस्थानकाबाहेर आला. (एमच-२७- डीए -०५०७) या क्रमांकाच्या कारमध्ये बसविले. कारमध्ये आधीच दोन युवक होते. तिघेही त्यांना घेऊन वर्धा मार्गाने जायला निघाले. बजाज यांनी युवकाला विचारणा केली. या मार्गाने लवकर गोंदिया येथे पोहोचू, असे युवकाने त्यांना सांगितले.

वर्धा मार्गावरील हुळदगाव परिसरात कार थांबविली. बजाज व मुलाला कारमधून बाहेर उतरविले. एका युवकाने पिस्तूल बजाज यांच्या पोटाला लावली. पैशांची मागणी केली. त्यानंतर अन्य एका युवकाने बजाज यांच्याकडील सोन्याचे कडे, सोनसाखळी, अंगठी, मोबाईल व रोख हिसकावली. दोघांना तेथेच सोडून अपहरणकर्ते पसार झाले.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

बजाज गोंदियाला गेले. शनिवारी त्यांनी गणेशपेठ पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी योगेश शांताराम पालीनकर (वय २७, रा. चिराग सिटी अमरावती), आकाश उर्फ आदिनाथ आनंदा रावणकर (वय २२) रा. शिपना कॅालेज अमरावती आणि अजय मोहन नायडे (वय २४) रा. शिपना कॅालेज अमरावती या तिघांना अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbed the cloth merchant and the boy in Nagpur