
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारूल थार्सेकर (३२, भवानी नगर) हे सराफा व्यापारी आहेत. त्यांचे वाठोडा ठाण्याअंतर्गत साईबाबानगरात राजेश उमारे यांच्या घरी सोन्या-चांदीचे ‘थार्सेकर ज्वेलरी’ या नावाने दुकान आहे.
नागपूर ः तीन सशस्त्र दरोडेखोरांनी उपराजधानीतील सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. लूटमार करताना व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला केला. आजूबाजूच्या दुकानदारांनी लगेच धाव घेतल्यामुळे दरोडेखोर पळून गेले. या घटनेत सराफा व्यापारी रक्तबंबाळ झाले. ही खळबळजनक घटना वाठोडा ठाण्याअंतर्गत दिवसाढवळ्या घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारूल थार्सेकर (३२, भवानी नगर) हे सराफा व्यापारी आहेत. त्यांचे वाठोडा ठाण्याअंतर्गत साईबाबानगरात राजेश उमारे यांच्या घरी सोन्या-चांदीचे ‘थार्सेकर ज्वेलरी’ या नावाने दुकान आहे. त्यांच्या शेजारी इतरही दुकान आहेत. पारूल यांनी मंगळवारी नेहमी प्रमाणे दुकान उघडले.
दुकानात ते एकटेच होते. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास २० ते २५ वयोगटातील दोन युवक चेहऱ्याला दुपट्टा बांधून दुकानात शिरले. कोरोनामुळे तोंडावर बांधून असल्यामुळे पारूल यांना संशय आला नाही. ग्राहक असल्याचा समज करून पारूल त्यांची आवड विचारण्याच्या तयारी असताना लुटारूंनी `तुमच्या जवळ जे काही असेल तर काढा’ असे म्हणत पारूल यांना चाकू दाखवला. त्यांना काही कळण्याआधीच लुटारूंनी चाकू काढला. पारूल यांच्यावर हल्ला चढविला.
मोठ्या हिमतीने पारूल यांनी त्याचा चाकू हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्यांचा तळहात रक्तबंबाळ झाला. आरोपींनी परत त्यांच्या डाव्या हातावर व पोटावर वार करून जखमी केले. याच वेळी सोबतच्या आरोपीने पारूल यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या तावडीतून निसटून दुकानातील खुर्चीवर उभे झाले आणि मदतीसाठी आरडाओरड करू लागले.
अधिक वाचा - ‘डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह’; यवतमाळच्या मातीत ‘शोले’चा रिमेक
आरडाओरड करताच पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी पळून गेले. दुकाना बाहेर त्यांचा तिसरा साथीदार वाहन घेऊन तयारीत होता. नियोजित पद्धतीने लूटमार करण्यासाठी आले. मात्र, त्यांचा लुटीचा प्रयत्न फसला. पारूल यांनी आरडा ओरड केल्याने लगेच शेजारचे दुकानदार धावले. पारूल यांनी पोलिस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आले असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
संपादन - अथर्व महांकाळ