भुकेलेल्यांना अन्न पुरविणारी रोटी बॅंक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

फाउंडेशनची चमू शहरातील मोठे हॉटेल्स, शाळा, लग्न कार्यक्रमात जाऊन तेथील वाचलेले चांगले जेवण गोळा करेल आणि भुकेल्यांना त्या अन्नाचे वाटप करेल. या ठिकाणाहून जेवण न मिळाल्यास फाउंडेशनच्या खर्चाने गरिबांना जेवण वाटण्यात येईल. यावेळी त्यांनी एक क्रमांकदेखील प्रसारित केला. या फोन क्रमांकावर संपर्क केल्यास गरजूंना अन्न देण्यात येईल.

नागपूर : स्मार्ट सिटीच्या घोषणा करणाऱ्या महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भारतात आजही दररोज 20 कोटी लोक उपाशी राहतात, हे वास्तव आहे. एकीकडे लग्न, हॉटेल्स, पार्टीज अशा ठिकाणी रोजच कितीतरी किलो अन्न वाया जात असताना दुसरीकडे काही लोकांवर उपाशी झोपण्याची पाळी येते. ही परिस्थिती बदलावी आणि निदान लोकांना पोटभर अन्न मिळावे, यासाठी अनेक उपक्रम देशात राबविण्यात येत आहेत.
गरीब आणि गरजू उपाशी लोकांना जेवण मिळावे, या उद्देशाने मुंबईनंतर नागपुरातही रोटी बॅंकची सुरुवात करण्यात आली असल्याचे रोटी बॅंक फाउंडेशनचे संचालक आणि सेवानिवृत्त पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी सांगितले.
डी. शिवानंदन यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅंसर हॉस्पिटल येथे या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, हॉस्पिटलचे डॉ. सुब्रोजित दासगुप्ता, डॉ. बी. के. शर्मा, चंद्रकांत देशमुख यांच्यासह रोटी बॅंक फाउंडेशनची चमू उपस्थित होती. फाउंडेशनची चमू शहरातील मोठे हॉटेल्स, शाळा, लग्न कार्यक्रमात जाऊन तेथील वाचलेले चांगले जेवण गोळा करेल आणि भुकेल्यांना त्या अन्नाचे वाटप करेल. या ठिकाणाहून जेवण न मिळाल्यास फाउंडेशनच्या खर्चाने गरिबांना जेवण वाटण्यात येईल. यावेळी त्यांनी एक क्रमांकदेखील प्रसारित केला. या फोन क्रमांकावर संपर्क केल्यास गरजूंना अन्न देण्यात येईल.

सविस्तर वाचा - मजनुगिरी करणाऱ्या पोलीसाचीच धुलाई

यावेळी डी. शिवानंदन म्हणाले, मी कधीही स्वप्नात विचार केला नव्हता की, इतक्‍या कमी वेळात हा उपक्रम सुरू होईल. डिसेंबर 2017 मध्ये मुंबई येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. लोअर परेल रेल्वेस्थानकाच्या बाहेर मांडव टाकून तेथे हा उपक्रम सुरू केला. दहा लोकांच्या मदतीने ही सुरुवात करण्यात आली. ज्यावेळी हा उपक्रम सुरू केला त्यावेळी पैसेदेखील नव्हते. त्यानंतर एका मित्राने चारचाकी वाहन दिले. आता फाउंडेशनकडे 11 वाहने असून त्यात 10 वाहने मुंबईला तर एक वाहन नागपूरला देण्यात आले. 2004 मध्ये ते नागपूरचे पोलिस आयुक्त असताना नागपुरातील स्वादिष्ट जेवणाने त्यांना भुरळ घातली होती. त्यामुळेच त्यांनी नागपूरची निवड केली असेही ते म्हणाले. भारत हा थ्री ट्रिलियन डॉलरचा देश आहे. एका वर्षांनंतर आपण लोकसंख्येच्या तुलनेत चीनलादेखील मागे टाकणार आहोत. भारत बलवान देश आहे.

दरदिवशी कोटी लोक उपाशी

एवढे असूनही आज भारतात दरदिवशी कोटी लोक उपाशीपोटी राहतात. आपल्याकडे जेवण भरपूर आहे. परंतु, नियोजनाअभावी जेवणाची नासाडी होते. दरदिवशी कितीतरी टन जेवणाची नासाडी होते. आतापर्यंत फाउंडेशनच्या वतीने 10 लाख लोकांना जेवण देण्यात आले आहे. मुंबई येथे ज्या शाळेत गरीब मुले शिकतात त्यांना जेवण देण्यात येते. मुंबईच्या टाटा कॅंसर हॉस्पिटल येथे दरदिवशी 500 लोकांना जेवण देण्यात येते. नागपुरात प्रसन्ना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक हा उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roti bank for beggers in nagpur