महिलांनो आता रेल्वे प्रवासाबाबत भीती नको, खास तुमच्यासाठी आरपीएफचे माय सहेली ऑपरेशन

योगेश बरवड
Monday, 26 October 2020

आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांच्या निर्देशानुसार विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर रेल्वे स्थानकावर अभियान राबवून महिलांमध्ये भयमुक्त प्रवासाची भावना निर्माण करण्यात प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम मध्यवर्ती नागपूर स्थानकावर सुरू करण्यात आली आहे.

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने आता 'ऑपरेशन माय सहेली' उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत अडचणीत असणाऱ्या प्रवासी महिलांना तत्काळ मदत करण्यासह प्रवासादरम्यानच्या चोरीच्या घटना टाळण्यासंदर्भातही जागृती करण्यात येत आहे. रेल्वे प्रवास सुरक्षित असल्याचा विश्वास या उपक्रमाद्वारे महिला प्रवाशांमध्ये निर्माण करण्यात येत आहे. 

आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांच्या निर्देशानुसार विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर रेल्वे स्थानकावर अभियान राबवून महिलांमध्ये भयमुक्त प्रवासाची भावना निर्माण करण्यात प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम मध्यवर्ती नागपूर स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षितेविषयक समस्या समजून घेणे, त्यावर तातडीने उपाय करणे आणि प्रवास करताना घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करणे आदी बाबींचा समावेश यामध्ये आहे. अभियानांतर्गत हावडा-मुंबई विशेष गाडी, हावडा-अहमदाबाद, गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस, नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेस गाड्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या रेल्वे गाड्या नागपुरात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी महिला प्रवाशांशी व्यक्तिश: भेट घेत आहेत.

हेही वाचा - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा 

प्रवासातील समस्यांविषयी त्यांची विचारपूस केली जात आहे. अडचणी असल्यास तत्काळ सोडवल्या जात आहेत. तसेच त्यांना २४ तास सुरू राहणाऱ्या १८२ या सुरक्षितता हेल्पलाईनची माहिती दिली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या आकस्मिक घटना किंवा अडचण असल्यास या हेल्पलाईनवर कॉल करावा.  सहप्रवशांकडून खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ नये. प्रवासाबाबत त्यांच्याशी चर्चा करू नये. खाण्यापिण्याच्या वस्तू केवळ आयआरसीटीसी पेंट्री कारमधून खरेदी कराव्या. प्रवासात त्यांच्याकडील साहित्याची काळजी घ्यावी तसेच बर्थ खाली असलेल्या कडीला बॅग साखळी व कुलुपाने बांधाव्या. खिडकीजवळ बसताना सोन्याच्या दागिन्यांना काळजीपूर्वक ठेवावे. प्रवासात शारीरिक अंतर राखावे आणि मास्क लावा, अशा सूचना प्रवासी महिलांना दिल्या जात आहे.

हेही वाचा - ऐन सणासुदीच्या दिवसात बोंडअळीमुळे कापूसही हातचा गेला, सांगा आम्ही जगायचं कसं?

नागपूर स्टेशनवर अशाच प्रकारे महिलांसाठी व्हॉट्‍सअ‌ॅपवर तेजस्वीनी ग्रुप होता. दररोज आपडाऊन करणाऱ्या महिला प्रवाशांचा त्यात समावेश होता. कुणालाही अडचण आल्यास ज्या महिला या ग्रुपवर मेसेज टाकायच्या त्यांना आरपीएफकडून तत्काळ मदत मिळायची. त्याच्या पुढच्या टप्प्यात आता 'ऑपरेशन माय सहेली' उपक्रम राबविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPF starts operation my saheli on nagpur railway station