`आरटीएमएनयू परीक्षा` घेणार ऑनलाइन परीक्षा

file photo
file photo

नागपूर  ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने ‘आरटीएमएनयू परीक्षा’ हे ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘एमसीक्यू’ पद्धतीने पेपर सोडविता येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यानी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. सुभाष चौधरी, म्हणाले, परीक्षेत मार्चपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेण्यात येणार आहे. यानुसार परीक्षेदरम्यान एका दिवसात चार टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये ९.३० ते १०.३० यादरम्यान वाणिज्य शाखा, ११.३० ते १२.३० यादरम्यान मानव्यशास्त्र शाखा, १.३० ते २.३० दरम्यान विज्ञान शाखा, ३.३० ते ४.३० दरम्यान अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा घेण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र दोन दिवसांत महाविद्यालयात पाठविण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणे शक्य नाही, त्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाइन संपल्यावर ऑफलाइन परीक्षा होईल. विशेष म्हणजे, यादरम्यान विद्यार्थ्यांना ॲपवर दिलेल्या सोयीनुसार परीक्षा कालावधी सोडून केव्हाही मॉक टेस्ट देता येणार आहे. महत्त्‍वाचे म्हणजे मंगळवारी विद्यापीठाने ॲपची यशस्वी चाचणी घेतल्याचे डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत कुलसचिव डॉ. नीरज खटी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे उपस्थित होते.
 
बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरू
अंतिम विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू असून इतर सेमिस्टरमध्ये बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर महाविद्यालय स्तरावर घेण्यात येत आहेत. राज्य सरकारने ठरविलेल्या ५० टक्के थेअरी आणि ५० टक्के आंतरिक गुणांच्या आधारावर गुणांकन करण्यात येत आहे.
 
७० हजारांवर विद्यार्थी
विद्यापीठातून अंतिम वर्षाच्या १८६ परीक्षेत ६३ हजार ५४० नियमित विद्यार्थी तर ७ हजार ३७९ (बॅकलॉग परीक्षा) माजी विद्यार्थी असे एकूण ७० हजार ८८३ विद्यार्थी सहभागी होतील. यासाठी १ हजार २७३ प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील २ हजार १०७ शिक्षकांनी पेपर तयार केले असून १ लाख ६४ हजार २१० प्रश्न तयार करण्यात आले आहेत.
 
पेपरदरम्यान राहणार वॉच

विद्यार्थ्यांना एका तासात २५ प्रश्न ऑनलाइन पद्धतीने सोडवायचे आहेत. त्यामुळे या एका तासात त्याने पेपर सोडविताना हालचाल केल्यास ॲपमध्ये त्याचा फोटो, संवाद आणि हावभाव रेकॉर्ड होणार आहेत. विशेष म्हणजे, एकदा विद्यार्थ्याने लॉगीन केल्यावर एक तासात त्याला इंटरनेटशिवाय पेपर सोडविता येणार आहे. मात्र, पेपर सुरू होताना व संपताना इंटरनेटची गरज पडणार आहे. मात्र, त्यानंतरही इंटरनेट न मिळाल्यास ३ तासांत तो जमा होईल. तरीही न झाल्यास विद्यापीठाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल. मात्र यादरम्यान त्यात काहीच बदल करता येणार नाहीत.

अशी करावी नोंदणी
प्रथम ॲप डाउनलोड करणे, यानंतर फाइल, मीडिया, फोटो, ऑडिओ या बाबींना अलाऊ करणे, विन्डो येताच त्यातील इन्स्ट्रक्शन, लॉगीन आणि मॉक टेस्ट असे तीन वेगवेगळे बटण येतील. यामध्ये लॉगीन करण्यासाठी युझर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. ज्या दिवशी ज्या विषयाचा पेपर आहे, तोच पेपर विद्यार्थ्यांना दिसणार असून ती सोडवता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com