दोन तरुणींची मध्यप्रदेशात विक्री; पाच जणांनी केला बलात्कार, एका आरोपीला अटक

अनिल कांबळे
Tuesday, 6 October 2020

१० हजार रुपये पगार आणि अन्य खर्च देण्याचे आमिष त्यांनी दिले. त्या जाण्यास तयार झाल्या. आरोपी आकाश आणि त्याचा साथीदार सुशील पैसाडील या दोघांनी जून-जुलैमध्ये त्यांना मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यात नेले. तेथे यादव नामक आरोपींना या दोघींची एक लाख ९० हजार रुपयात विक्री केली.

नागपूर : बेरोजगार असलेल्या दोन तरुणींना एका दलालाने जाळ्यात ओढून चांगल्या पगारावर काम मिळवून देण्याचे आमिष दिले. त्या दोघींनाही मध्यप्रदेशात नेले आणि तेथे एक लाख ९० हजार रुपयांत विकले. तेथे दोन्ही तरुणींवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश श्रीवास (रा. पारडी) याला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. चार आरोपी फरार आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, तरुणी एकमेकांच्या नातेवाईक आहेत. बेरोजगार असल्यामुळे त्या कामाच्या शोधात होत्या. त्यांची भेट जूनमध्ये माया नामक महिलेशी झाली. तिने त्यांना घरोघरी जाऊन साहित्य विकण्याचा रोजगार दिला. त्यानंतर पारडीतील आकाश श्रीवास याच्याशी त्या दोघींची ओळख झाली. त्याने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तसेच मध्य प्रदेशात या दोन ठिकाणी मोठी ऑर्डर असून तेथे जाऊन आपल्याला माल विकायचा आहे असे सांगितले.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

१० हजार रुपये पगार आणि अन्य खर्च देण्याचे आमिष त्यांनी दिले. त्या जाण्यास तयार झाल्या. आरोपी आकाश आणि त्याचा साथीदार सुशील पैसाडील या दोघांनी जून-जुलैमध्ये त्यांना मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यात नेले. तेथे यादव नामक आरोपींना या दोघींची एक लाख ९० हजार रुपयात विक्री केली.

आरोपीने एका मंदिरात या दोघींसोबत जबरदस्तीने लग्न लावले आणि त्यांच्यावर ते अत्याचार करू लागले. त्यांचा अत्याचार असह्य झाल्यामुळे मुली विरोध करू लागल्या. त्यापैकी एकीने आपल्या आईला फोन करून सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून मुलींचा शोध लावला.

हेही वाचा - एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार

पाच जणांवर गुन्हे दाखल

गिट्टीखदान पोलिसांनी मध्यप्रदेशातील टिकमगड पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना मुलींबाबत सर्व माहिती दिली. तसेच गिट्टीखदानचे एक पथक मुलींच्या आईसोबत शनिवारी तिथे पोहोचले. त्यांनी मुलींना आणि आरोपी आकाशला ताब्यात घेतले. त्यांना नागपुरात आणण्यात आले. मुलींच्या तक्रारीवरून आरोपी आकाश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरण करून विक्री करणे, बलात्कार करणे आदी आरोपांखाली अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of two young women in Madhya Pradesh