'ब्युटीफुल अ‌ॅक्सिडेंट स्पॉट'; संदीप जोशींनी केले एक ट्विट अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

राजेश चरपे
Thursday, 21 January 2021

संदीप जोशी यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये गडकरी मंत्री असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागालाच टोमणा मारला होता. नंतर त्यात दुरुस्ती करून सुंदर अ‌ॅक्सिटेंड स्पॉट तयार केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले.

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या तसेच त्यांच्याच हस्ते शनिवारी लोकार्पण होऊ घातलेल्या वंजारीनगर उड्डाणपूल बांधून आणखी एक सुंदर 'अ‌ॅक्सिडेंट स्पॉट' तयार केल्याबद्दल माजी महापौर संदीप जोशी यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरल्याने भाजपात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

संदीप जोशी यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये गडकरी मंत्री असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागालाच टोमणा मारला होता. नंतर त्यात दुरुस्ती करून सुंदर अ‌ॅक्सिटेंड स्पॉट तयार केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. चुकीच्या माहितीमुळे आपण राष्ट्रीय महामार्ग असा उल्लेख केल्याचे त्यांनी आपल्या सुधारित ट्विटमध्ये म्हटले आहे. ही चूक अपघाताने झाली की मुद्दाम केली याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ते काहीही असले तरी त्यांच्या ट्विटची दिवसभर चांगलीच चर्चा होती. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीन गडकरी यांनीच या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. तो आता तयार झाला आहे. शनिवारी लोकार्पणाची तारीख ठरली आहे. या पार्श्वभूमीवर जोशींनी ट्विट केल्याने वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत. 

हेही वाचा - बापरे! पूर्व विदर्भातील १ हजार २८३ चिमुकल्यांनी पाहिला नाही पहिला वाढदिवस

नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते सोमवारीच राष्ट्रीय सुरक्षा महिना उपक्रमाचे उद्‍घाटन झाले. यात नितीन गडकरी यांनी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या जाहीर करून रस्त्यांवरील अपघातांची संख्या ५० टक्क्यांच्या खाली आणणार, असे जाहीर केले आहे. तत्पूर्वी किती अ‌ॅक्सिडेंटल स्पॉट दुरुस्त करण्यात आले, त्यावर किती कोटी रुपये खर्च करण्यात आला याची सविस्तर माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिली होती. हे सर्व प्रयत्न सुरू असताना आणखी वंजारीनगर येथे सुंदर पूल बांधून तेवढाच सुंदर अ‌ॅक्सिडेंटल स्पॉट तयार करण्यात आल्याने जोशी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेधही केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandeep joshi called wanjari nagar road is beatiful accident spot