
मध्य भारतात मेडिकल हब म्हणून नागपूरचा विकास होत असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नाही
नागपूर : गेल्या ९ महिन्यांमध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये १ हजार २८३ चिमुकल्यांनी पहिला वाढदिवसही बघितला नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार करता ३०८ चिमुकले दगावले असल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. कोरोनाच्या संकटासह कोवळ्या पानगळीचेही संकट कायम आहे.
हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा
मध्य भारतात मेडिकल हब म्हणून नागपूरचा विकास होत असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालमृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नाही. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात १ हजार २८३ मुले जन्मानंतर एका वर्षाच्या आत दगावली आहेत. गर्भवती माता आणि मुलांच्या संगोपनासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत बाळंतपणात एकही माता उपचाराअभावी दगावता कामा नये, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, तरीही माता मृत्यूच्या दरात पाहिजे ती घट झाली नाही.
हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
जिल्हानिहाय मृत्यूसंख्या -
जिल्हा | मृत्यूसंख्या |
नागपूर | ३०८ |
चंद्रपूर | २८४ |
गडचिरोली | २७४ |
भंडारा | १६८ |
गोंदिया | १४५ |
वर्धा | १०४ |
सध्या स्थितीत बालमृत्यूंवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूची कारणे अनेक आहेत. कमी वजनाचे तसेच अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्माला आल्यानंतर धोका असतो. कुपोषण, न्यूमोनिया, जंतू संसर्ग तसेच अतिसार आणि श्वसनाचे विकार बालमृत्यूस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात.
-डॉ. अविनाश गावंडे, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, नागपूर.