मोठी बातमी : तुकाराम मुंढे यांना हाकलण्यावर महापौर संदीप जोशी काय म्हणाले, वाचा...

Sandeep joshi says I have no intention of pushing Tukaram Mundhe
Sandeep joshi says I have no intention of pushing Tukaram Mundhe

नागपूर : महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आम्हाला काडीचाही रस नाही. त्यांच्यावर अविश्‍वासदेखील आम्ही आणणार नाही. शहराचे कामकाज व्यवस्थित चालावे. पदाधिकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी सकारात्मक कामे करावी. जनतेचा आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींचा सन्मान करावा, हीच आमची अपेक्षा आहे. त्यांनी जर हे केले, सर्वप्रथम त्याचे मी स्वागत करेल, असे महापौर संदीप जोशी यांनी दै. सकाळच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

20 जूनला महापालिकेच्या होणाऱ्या सभेत सदस्य तुकाराम मुंढे यांना घेरणार असल्याचे काही सदस्यांकडून सांगण्यात येत आहे. या सभेत आयुक्त आणि सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झडणार असा अंदाज आहे. अविश्‍वास ठराव आणणार, असेही काहींचे म्हणणे आहे. कारण, महानगरपालिकेत महापौर, नगरसेवक येवढेच काय तर विरोधी पक्ष नेत्यांचेसुद्धा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत पटेनासे झाले आहे. यामुळे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यात सरकार आमचं नाही. ज्यांचे सरकार आहे त्यांनीच तुकारा मुंढे यांना विशिष्ट हेतूने येथे पाठवलेले आहे. त्यांना सांगितलेलेच काम ते बरोबर करीत आहेत. त्यांच्या वागणुकीबद्दल, वर्तवणुकीबद्दल आम्हाला आक्षेप आहे. त्यांच्या हुकुमशाहीबद्दल, आडमुठ्या धोरणाबद्दल आम्हाला आक्षेप आहे. अजून आक्षेप हा आहे की, मुंढे लोकप्रतिनीधींना व जनतेला कुठल्याही प्रकारची किंमत देत नाहीत, ही आमची तक्रार आहे, असेही महापौर संदीप जोशी म्हणाले. 

कुणाला पीटीशन करायची असेल तर ती जरुर करावी. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची मतं-मतांतरं असतात. राज्यात आम्ही विरोधी पक्षात आहोत. आमचे सरकार असते तर मुंढे येथे आलेच नसते. सरकारकडून त्यांना येथे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना परत नेण्याचा किंवा इतपत्र पाठवण्याचा निर्णयही सरकारच घेईल. त्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही आणि आम्हाला काही करायचेही नाही, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

कायद्यानुसार सभागृह सर्वोच्च आहे. पण सभागृहात घेतलेल्या निर्णयांवरही मुंढे अंमलबजावणी करीत नाहीत. कायद्याचेही ते पालन करीत नाही. उलट मी नियमांत राहून काम करतो असे सांगत फिरतात. त्यांचे असे म्हणणे चुकीचे आहे. सभागृहात झालेल्या निर्णयांचे पालन न करणे हे कोणत्या नियमात आहे, हे तरी त्यांनी पदाधिकाऱ्यांना पटेल अशा भाषेत सांगावे, असे महापौर जोशी म्हणाले. 

स्वभाव, वागणुकीत घडवावा बदल

तुकाराम मुंढे यांना नागपुरातून हाकलण्यात आम्हाला काडीचाही रस नाही. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणजेच सरकार आहे. अधिकारी हे नोकरशहा आहेत. जनतेने म्हणजेच लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांना करायची आहे. पण सर्वच निर्णय ते स्वतःच्या मनाने घेऊन त्यावर अंमल करीत असतील, तर ते चुकीचेच आहे. अजूनही त्यांनी आपल्या स्वभावात, वागणुकीत बदल घडवून आणला तर त्याचे स्वागतच आहे.

मुंढेंच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

मुंढे व पदाधिकाऱ्यांचा संघर्ष शहराला माहिती झाला आहे. नागपूर शहरातून मुंढे यांची बदली करण्यासाठी सर्व जण प्रयत्नात लागले आहेत. तशी चर्चा मुंबईपासून नागपूरपर्यंत सुरू झाली आहे. मात्र, नागपूरकर सोशल मीडियावर स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून मुंढेंच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com