दुसऱ्यांच्या जिवासाठी 'त्यांची' धडपड; संजय कुमार गुप्ता करताहेत जनजागृतीचं कौतुकास्पद काम 

मंगेश गोमासे 
Thursday, 18 February 2021

वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने दरवर्षी हजारो वाहनचालकांचे बळी जातात. सतरा वर्षांपूर्वी असेच मोपेडचे स्टॅण्ड न लावल्याने वाडी परिसरात एक अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने संजय कुमार गुप्ता दीड महिने कोमात होते

नागपूर ः कसलीही अपेक्षा न करता, दुसऱ्याच्या कुटुंबातील ‘दिवा‘ तेवत ठेवण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून संजय कुमार गुप्ता सातत्याने वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करीत आहे. रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमांचे पाळण्याचे आवाहन अविरतपणे करून कुटुंबाचा ‘दिवा‘ तेवत राहावा यासाठीही ते धडपडत आहेत.

हेही वाचा - नागरिकांनो! महापालिकेची थकबाकी भरलीय का? मालमत्ता लवकरच लिलावात

वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने दरवर्षी हजारो वाहनचालकांचे बळी जातात. सतरा वर्षांपूर्वी असेच मोपेडचे स्टॅण्ड न लावल्याने वाडी परिसरात एक अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने संजय कुमार गुप्ता दीड महिने कोमात होते. मात्र, जगण्याची प्रबळ इच्छा मनात ठेवून नियतीसमोर हार न मानता, पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू केले. आजही अपघातामुळे ते अडखळत बोलतात. 

मात्र, स्वतः वाहतूक नियमांचे पालन न केल्याने ओढवलेली परिस्थिती दुसऱ्यावर येऊ नये. तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती केल्यास त्यातून एखादा जरी जीव वाचविता आला तर आपण यशस्वी होऊ या भावनेतून संजय कुमार गुप्ता यांनी ‘युथ डेव्हलपमेंट अलायन्स' ही सामाजिक संस्था २००५ साली सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ते जनजागृती करतात. ४३ वर्षीय संजय गुप्ता हे फार्मसीच्या दुकानात काम करतात. यातून मिळालेले उत्पन्न ते याच कामासाठी खर्च करतात हे विशेष.

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाकडून पुरस्कार

संजय कुमार गुप्ता यांनी वाहतूक नियमांच्या जनजागृतीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाकडून यांच्याकडून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना २०२१ च्या दिल्ली येथे पार पडलेल्या उद्‍घाटन समारंभादरम्यान राज्यातून ‘गुड स्मार्टीयन अॅवार्ड' ने सन्मानित करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Gupta spreading awareness about traffic rules in Nagpur