फुल खिलते रहेंगे दुनिया में... निसर्गाने केली रंगांची मुक्त उधळण 

file photo
file photo

नागपूर : घटलेले प्रदूषण, वाढलेले तापमान आणि अवेळी बरसत असलेला पाऊस या बदललेल्या हवामानामुळे निसर्गाने आपला नैसर्गिक भाव कायम ठेवत शहरातील अनेक परिसर फुलांच्या विविध रंगांनी न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राचे राज्य फूल जारुळ, अमलतास, करंजची फुले, बोगनवेल, देवचाफा, निलक आणि गुलमोहोराने उद्याने, रस्ते काबीज केली आहेत. बघावे तेथे ही फुले फुलली आहेत. अनेक भागांत नेत्रसुखद फुलांनी फुललेल्या वृक्षांचे दर्शन होत आहे. 

कडक उन्हाळ्यात जांभळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्याच्या शेजारी ही झाडे लावली आहेत. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात. सर्रास पिवळा गुलमोहोर म्हणून काही ठिकाणी ओळख असलेले अमलतास वनस्पतिशास्त्रात पेल्टोफोरम टेरोकारपम म्हणूनही परिचित आहे. या झाडाने उद्यान आणि रस्ते काबीज केले आहेत. बघावे तेथे अमलतास फुलले आहे. 

वैशाखच्या वणव्यात स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो आहे. वर्षातून एकदाच तोही उन्हाळ्यातच फुलतो. लॉकडाउनमुळे त्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी रस्त्यावरील गर्दीच गायब झालेली आहे. बोगनवेल ही हिरवट पांढरा, लालभडक, जांभळा, सर्वसाधारण दिसणारा गडद गुलाबी अथवा राणी हळदी पिवळा अशा अनेक सुंदर रंगात फुलते. या झाडाला काटे असतात. फांदीच्या शेंड्यावरील काट्याचे परिवर्तन या फुलोऱ्यात होते. बघतच राहावे अशी ही फुले शहरातील रस्त्यांच्या मधोमध फुलली आहेत. देवचाफा हा शहरातील अनेक भागांत दिमाखात उभा आहे. या झाडांची फुले पांढरी असून, मध्ये पिवळा रंग असतो. ही फुलेही रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com