मोठी बातमी! शाळांची दारं उघडण्यास होणार आणखी विलंब; नागपुरात १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद

राजेश प्रायकर 
Sunday, 22 November 2020

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत माध्यमिक शाळा व कॉलेज सुरू करण्याचे आदेश काढले होते. दरम्यान, कोरोनाने पुन्हा तोंडवर केल्याने अनेक शहरात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला.

नागपूर ः कोरोनाचा वाढता प्रकोप, पालकांनी नाकारलेले संमतीपत्र, पालक संघटनांनी केलेल्या विरोधानंतर नागपूर महापालिकेने शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारपासून शहरातील शाळा सुरू होणार नसून एक लाख ३२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनीही तूर्तास सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर महापालिका शाळा सुरू करण्याचा निर्णय डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. दरम्यान ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहे.

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत माध्यमिक शाळा व कॉलेज सुरू करण्याचे आदेश काढले होते. दरम्यान, कोरोनाने पुन्हा तोंडवर केल्याने अनेक शहरात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. महापालिकेनेही काल, शुक्रवारी सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधी सर्व मुख्याध्यापकांना शाळेचे निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे निर्देश दिले होते. आज शहरातील महापालिकेच्या अनेक शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्याही करण्यास सुरुवात करण्यात आली. महापालिका क्षेत्रात ५९३ शाळांतील सहा हजार २५२ शिक्षकांपैकी आजपर्यंत केवळ तीन हजार ६५० शिक्षकांनीच चाचणी केली. अजूनही १०० टक्के शिक्षकांची चाचणी झाली नाही. याशिवाय शाळांची स्वच्छताही पूर्ण झाली नाही. विशेष म्हणजे पालकांनीही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र दिले नाही. परिणामी शुक्रवारी घेण्यात आलेला शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेला मागे घ्यावा लागला. 

आज सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सोमवारपासून शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील कोरोनाची स्थिती, पालकांची मनस्थिती, संपूर्ण शिक्षकांची चाचणी आदींचा आढावा घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सुत्राने सांगितले.

शहरातील १६ शिक्षक पॉझिटिव्ह

शहरात मनपा व खासगी, अशा ५९३ शाळा आहेत. या शाळांतील सहा हजार २५२ शिक्षकांपैकी आजपर्यंत तीन हजार ६५० शिक्षकांनी कोरोना तपासणी केंद्रावर आरटीपीसीआर चाचणी केली. यात शहरातील १६ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले. ग्रामीण भागात ६५७ शाळांतील पाच हजार ७७९ शिक्षकांपैकी तीन हजार १७३ शिक्षकांनी चाचणी केली. यातून २५ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले.

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू

शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला. मात्र, ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आल्याचे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नमूद केले. सोमवारपासून ग्रामीण भागातील ६५७ शाळा सुरू होणार आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: schools in nagpur will be closed till 13 december