पोलिस-नागरिक मैत्रीचे अनोखे शिल्प ठरणार नागपुरची ओळख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सुंदर वास्तुशिल्पामुळे नागपूर शहराची देशात वेगळी ओळख निर्माण होईल. या वास्तुशिल्पात सामान्य कुटुंब दिसत असून, त्यांच्या आजूबाजूला पोलिस आणि सैनिकांच्या प्रतिकृती आहेत. पोलिस समाजाचे तर सैनिक हे देशाचे संरक्षण करीत असल्याचे शिल्पात दर्शविले आहे. या शिल्पातून पोलिस आणि सैनिक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यात येत आहे.

नागपूर : येथील राजभवनासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस-नागरिक चौकाचे उद्‌घाटन आमदार विकास ठाकरे यांनी केले. या वेळी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी आणि अपर पोलिस आयुक्‍त डॉ. नीलेश भरणे उपस्थित होते.
या वेळी डॉ. गिरीश गांधी म्हणाले की, या सुंदर वास्तुशिल्पामुळे नागपूर शहराची देशात वेगळी ओळख निर्माण होईल. या वास्तुशिल्पात सामान्य कुटुंब दिसत असून, त्यांच्या आजूबाजूला पोलिस आणि सैनिकांच्या प्रतिकृती आहेत. पोलिस समाजाचे तर सैनिक हे देशाचे संरक्षण करीत असल्याचे शिल्पात दर्शविले आहे. या शिल्पातून पोलिस आणि सैनिक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यात येत आहे.
तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी वनराई फाउंडेशनच्या माध्यमातून असे शिल्प साकारले जावे, अशी संकल्पना मांडली होती. वनराईने ती संकल्पना आज प्रत्यक्षात साकारली आहे. सदर शिल्पाला तत्कालीन मनपा आयुक्‍त अभिजित बांगर यांनी सहकार्य केले आहे.

सविस्तर वाचा - पोलिस अधिकाऱ्यांची चलाखी, आवडीच्या ठिकाणी होतात उशिरा रुजू

पोलिस आणि नागरिकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध वाढावेत तसेच मैत्रीपूर्ण संबंध जोपासावे, या उद्देशाने वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी आणि नागपूर शहरचे तत्कालीन पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी या चौकाची संकल्पना मांडली होती. त्यामुळे राजभवनासमोरील चौकात सुंदर वास्तुशिल्प उभारण्यात आले आहे. शिल्पाची निर्मिती नागपुरातील कलावंत निखिल बोंडे आणि अमित पांचाळ यांनी केली. डॉ. उपाध्याय म्हणाले की, वास्तुशिल्पातून समाजापर्यंत मोलाचा संदेश पोहोचला आहे. या शिल्पामुळे पोलिस आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ होतील. प्रास्ताविक एसीपी अशोक बागुल यांनी केले. आभार डीसीपी चिन्मय पंडित यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A sculpture on Police-citizen friendship