नांदेडवरून आलेली बोगस खताची 600 पोती पकडली, कशी केली कारवाई, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

दुकान मालकाकडे त्या खताच्या खरेदीची पावतीसुद्धा नव्हती, तसेच त्या पोत्यांवर निर्माण केल्याची तारीख, बॅच नंबर व इतर आवश्‍यक बाबी त्या पोत्यांवर नव्हत्या. ही सर्व बोगस खताची पोती नांदेडवरून आणल्याचे दुकान मालकाने सांगितले. बोगस खतविक्रीप्रकरणी जय अग्रो एजन्सी अंबाडा (सा.) या दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली 600 पोती बोगस खत इंदरवाडा येथील शासकीय गोदामात पाठविण्यात आली

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यात बोगस बियाणे व खत विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक
कार्यवाहीचे सत्र नरखेड तालुका कृषी विभागामार्फत सुरू असून एकाच महिन्यात तालुक्‍यात दुसरी
कार्यवाही केली. मंगळवारी जय अग्रो एजन्सी अंबाडा (सा.) या दुकानावर बोगस खत विकण्याप्रकरणी
कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आरोपी असून चंद्रशेखर नानाजी बेले (वय 49, अंबाडा, सा.) व नानाजी माधव बेले (वय 69,अंबाडा, सा.) अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा : पीक कर्जवाटपात बॅंका का घेतात हात आखडता, कारण आहे "हे'...

पाच लाख 98 हजारांचा माल
नरखेड तालुक्‍यातील अंबाडा (सा.) येथील जय अग्रो एजन्सी येथून जवळपास 600 पोती बोगस खत जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 20.20.0 या खताची 200 पोती किंमत 2 लाख रुपये, 18.18.10 ची 200 पोती किंमत2 लाख रुपये,17.17.17 या खताची 100 पोती किंमत 98 हजार रुपये असा एकूण 5 लाख 98 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

हेही वाचा :कोरोनाचा वार; नागपुरात पाच वस्त्या सील

मालावर नव्हती तारीख व बॅच नंबर
नरखेड येथील कृषी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांनी शनिवारी (ता.13) जय अग्रो एजन्सी अंबाडा (सा.) या दुकानाची तपासणी केली. दुकानांमध्ये बोगस खताची पोती असल्याचे निष्पन्न झाले. दुकान मालकाला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. दुकान मालकाकडे त्या खताच्या खरेदीची पावतीसुद्धा नव्हती, तसेच त्या पोत्यांवर निर्माण केल्याची तारीख, बॅच नंबर व इतर आवश्‍यक बाबी त्या पोत्यांवर नव्हत्या. ही सर्व बोगस खताची पोती नांदेडवरून आणल्याचे दुकान मालकाने सांगितले. बोगस खतविक्रीप्रकरणी जय अग्रो एजन्सी अंबाडा (सा.) या दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली 600 पोती बोगस खत इंदरवाडा येथील शासकीय गोदामात पाठविण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून आरोपी चंद्रशेखर नानाजी बेले (वय 49,अंबाडा सा.) अटक करण्यात आली आहे. नानाजी माधव बेले यांना अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास ठाणेदार दीपक डेकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राजेश कोल्हे, चेतन राठोड करीत आहेत. दोन्ही आरोपींना आज नरखेड येथील न्यायालयात हजार करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seized 600 bags of bogus manure from Nanded