पीक कर्जवाटपात बॅंका का घेतात आखडता हात, कारण आहे हे...

umared
umared

जलालखेडा (जि.नागपूर) : सध्या कापूस खरेदी संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरी 50 टक्के कापूस पडून आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापूस, तूर व हरभरा शासनाला विक्री केले आहे, त्यापैकी बऱ्यांच शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांची पेरणी करायची लगबग सुरू झाली आहे. बाजारातून बी-बियाणे खरेदी करायचे आहे, अशा वेळेस बॅंक त्या शेतकऱ्यांना अतोनात त्रास देत आहे. कुठल्याच प्रकारचे सहकार्य बॅंकेकडून शेतकऱ्यांना होत नाही. आतापर्यंत नरखेड तालुक्‍यात फक्त 24 टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी?
नरखेड तालुक्‍याला शासनाने 70 कोटी 76 लाख 80 हजार रुपये पीककर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक दिला आहे. पण, अजूनपर्यंत पेरणी सुरू होऊनसुद्धा नरखेड तालुक्‍यातील संपूर्ण 14 बॅंकांनी आतापर्यंत फक्त 25 टक्के पीककर्ज वाटप केले आहे. नरखेड तालुक्‍यात एकूण 14 बॅंक या शेतकऱ्यांना वित्तीय साहाय्य पुरवठा करते. त्याची आकडेवारी पाहिली असता, असे लक्षात येते की, एकूण नियमित कर्जवाटप 948 शेतकऱ्यांना 10 कोटी 54 लाख 35 हजार रुपये
वाटप केले. नवीन कर्जधारक 589 शेतकऱ्यांना 6 कोटी 48 लाख 85 हजार रुपये वाटप केले आहे. नरखेड तालुक्‍यांची आकडेवारी बघता, 1,537 शेतकऱ्यांना 17 कोटी तीन लाख 20 हजार रुपये फक्त वाटप झालेले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत फक्त 364 नियमित शेतकऱ्यांनाच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफी झालेल्या तसेच नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले नाही. अशास्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्‍न नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर उद्भवलेला आहे.

बॅंकेजवळ निधीचा अभाव
नरखेड तालुक्‍यात एकूण 35 हजार 600 शेतकरी खातेधारक असून, बॅंकेने केलेला कर्जपुरवठा बघता अतिशय कमी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेजवळ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी निधी नाही. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बॅंक शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी उदासीन आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावकाराच्या उंबरठ्यावर जाणे, हा एकच पर्याय आहे. बॅंकेकडून पीककर्जासाठी मागितली जाणारी अनेक कागदपत्रे ही महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे. पण, महसूल विभाग ही कागदपत्रे देण्यास हलगर्जीपणा दाखवीत असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी ताटकळत राहावे लागत आहे. सध्या बॅंकेकडून ग्राहकांना आत प्रवेश नसल्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी बॅंकेच्या बाहेर तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

अत्यंत खेदजनक बाब !
स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुद्धा अजूनपर्यंत एकही मीटिंग घेतली नाही. ही अत्यंत खेदजनक बाब असून, या विषयाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, ग्रामपंचायतस्तरावर पीककर्ज वाटपाचे शिबिर लावून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करावे, जेणेकरून या संकटाच्या वेळी शेतकरी पेरणी पूर्ण करू शकेल व त्यांचा प्रश्न सुटेल.
-संदीप सरोदे, माजी सभापती, पंचायत समिती, काटोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com