
ही प्रेरणादायी कहाणी आहे शताब्दीनगर येथील सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेच्या मुला-मुलींची. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेत सध्या अडीचशे गोरगरीब मुलं-मुली आहेत. यातील बहुतांश मुले शंभर वर्षे जुन्या रहाटेनगर झोपडपट्टीत राहणारी
नागपूर : काही दिवसांपूर्वी ही मुले रस्त्यावर कचरा वेचून मायबापांना आर्थिक मदत करीत होती. वाईटांच्या संगतीत येऊन व्यसनाधिन बनू लागली होती. एकेदिवशी खुशाल ढाक नावाच्या एका भल्या माणसाच्या संपर्कात आली आणि जगण्याचा नवा मार्ग मिळाला. खेळ आणि इतर ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून त्यांनी या मुलांना खेळाडू बनविले; व्यसनमुक्त केले. अल्पावधीतच मुलांनी प्रगती साधून खेळाच्या मैदानावर झेंडा गाडला.
ही प्रेरणादायी कहाणी आहे शताब्दीनगर येथील सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेच्या मुला-मुलींची. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेत सध्या अडीचशे गोरगरीब मुलं-मुली आहेत. यातील बहुतांश मुले शंभर वर्षे जुन्या रहाटेनगर झोपडपट्टीत राहणारी आणि कचरा वेचणाऱ्या, भीक मागणाऱ्या, ऑटोचालक व भाजीपाला विकणाऱ्यांची आहेत. अशिक्षित असल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे व्यसन जडले होते.
हेही वाचा - "ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या";...
संस्थेचे अध्यक्ष खुशाल ढाक यांनी या वंचित मुलांना जवळ केले. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. सुजाण व सुसंस्कारी नागरिक घडवितानाच त्यांना खेळाडूही बनविले. क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्ससह संगीत व अन्य क्षेत्रांत नाव कमावू लागले. शिक्षण व खेळांमध्ये रमल्याने त्यांचे व्यसन सुटले. आता ते कचराही वेचत नाही अन भिकसुद्धा मागत नाहीत.
या मुलांनी काही महिन्यांपूर्वी झारखंडमध्ये झालेल्या फुटबॉल स्पर्धेत तृतीय स्थान पटकावून आपल्यातील गुणवत्ता दाखवून दिली. मानकापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मैदानी स्पर्धेतही सायली माटे नावाच्या मुलीने ब्रॉंझपदक जिंकले. इतरही मुला-मुलींनी चमकदार प्रदर्शन करून भविष्याच्या दृष्टीने नव्या आशा निर्माण केल्या आहेत. हे सर्व खेळाडू शिक्षण सांभाळून दररोज सकाळ-संध्याकाळ कलोडे कॉलेज व भगवाननगर मैदानावर नियमित प्रॅक्टिस करतात. प्रदीप गायकवाड, रोहित मिश्रा, रिषी लोधे, समीर देशपांडे, युगा व कृणालसारखे गुरू त्यांच्यावर कसून मेहनत घेत आहेत. मुलांमध्ये असलेली जिद्द, टॅलेंट, स्टॅमिना व झपाट्याने होत असलेली प्रगती लक्षात घेता, ते भविष्यात चांगले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू बनून संस्थेसोबतच शहरालाही नावलौकिक मिळवून देतील, अशी आशा ढाक यांनी व्यक्त केली.
समाजाकडून मदतीचे आवाहन
संस्थेच्या मुला-मुलींकरिता लवकरच काळडोंगरी येथे निवासी शाळा बांधण्यात येणार आहे. या कामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन खुशाल ढाक यांनी केले आहे.
हेही वाचा - बाप करीत होता मुलीला मारहाण; काकाने मध्यस्ती केली असता घडला हा थरार
या गोरगरीब वंचित मुलांना सुजाण नागरिक घडविण्यासोबतच उत्तम खेळाडू बनविणेही आमचा मुख्य उद्देश आहे. क्रीडासह विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करून ते भविष्यात आपल्या पायावर उभे राहावेत, त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. '
-खुशाल ढाक,
अध्यक्ष, सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्था.
संपादन - अथर्व महांकाळ