पुढील महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग; आयुक्तांनी काढले आदेश 

राजेश प्रायकर  
Sunday, 10 January 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील ८ डिसेंबरला मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांंना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांत उत्साह होता. परंतु गेल्या महिनाभर प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांत निराशा होता

नागपूर ः मागील महिन्यात राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिल्यानंतरही महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आज आयुक्तांनी ‘गुड न्यूज' दिली. पुढील फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगासह वेतन मिळणार आहे. वित्त व लेखा विभागाने सर्व विभागांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील ८ डिसेंबरला मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांंना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांत उत्साह होता. परंतु गेल्या महिनाभर प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांत निराशा होता. ‘सकाळ'ने ५ जानेवारीला ठळकपणे ‘महापालिकेने मुख्यमंत्र्यांचेही आदेश पायदळी तुडविले‘ या मथळ्यासह वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वित्त व लेखा विभागाने प्रक्रिया संथ केल्याकडेही आयुक्तांचे वृत्तातून लक्ष वेधन्यात आले होते. 

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

आज आयुक्तांच्या आदेशाने वित्त व लेखा विभागाने सर्व विभागांंना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सर्व कर्मचाऱ्यांकडून विकल्प फॉर्म, वेतन निश्चिती फॉर्म तसेच वचनपत्र भरून घेत सेवापुस्तकात नोंद करण्याच्या सूचनाही प्रमुख वित्त व लेखा अधिकारी विजय कोल्हे यांनी केल्या आहेत. 

सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारीचे फेब्रुवारीमध्ये मिळणारे वेतन सातव्या वेतन आयोगासह देण्यात येणार असल्याने कार्यवाहीची सर्व कागदपत्र सादर करावी, असेही त्यांनी परिपत्रकात नमुद केले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून आयुक्तांनाही धन्यवाद दिले.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

११ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

सातव्या वेतन आयोगाचा महापालिकेतील अकरा हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना लाभ होणार आहे. आज सायंकाळी सातव्या वेतन आयोगाची माहिती मिळताच कर्मचारी आनंद साजरा केला. वेतन आयोग जानेवारीपासून लागू केल्याने महापालिकेतील राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, संजय मोहळे, प्रवीण तंत्रपाळे, शिक्षक संघाचे राजेश गवरे यांनी आयुक्तांचे आभार मानले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh Pay in next month salaries of Nagpur NMC