हे खरं आहे? ‘लादेन'विरुद्ध काटोल पोलिसांनी काढले आव्हान पत्रक

सुधीर बुटे
Thursday, 6 August 2020

बोली प्रकारात रक्कम उचलून फायद्याचे वाटप होते. याच व्यवहारात आरोपी शब्बो उर्फ लादेन उर्फ रफिक मुख्तार दाऊद शेख (वय४०,रेल्वे स्टेशन काटोल) याने सुमारे शंभरावर व्यक्तींकडून वसुलीची रक्कम घेऊन शब्बो अचानक पसार झाल्याने आता भिसीवरील विश्वास उडाल्याची चर्चा रंगत आहे.

काटोल (जि.नागपूर) : अगोदर ‘त्याने’ शहरात बस्तान ठोकले. हळूहळू परिसरातील लोकांचा विश्‍वास संपादन केला. शहरातील काही प्रतिष्ठीतांकडे त्याचे उठणे-बसणे सुरू झाले. त्यांच्याकडून भिशीच्या नावाने नियमित पैसे गोळा करू लागला. पुढे व्यवहार वाढत गेले. लॉकडाउनमध्ये तो शहरातून अचानक गायब झाला. तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमिनच सरकली.

शहरात शब्बो उर्फ लादेन उर्फ रफिक अशा विविध नावाने प्रचलित असलेल्या चाळीस वर्षीय तरुणाने मासिक भिशीच्या लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार झाल्याचा प्रकार उघड झाला. प्रत्यक्ष पीडितांनी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर खरा प्रकार पुढे आला. याबाबत थेट काटोल पोलिसांनी बुधवारी जाहीर आवाहन करून आरोपींची माहिती सांगण्याबाबत पत्रके प्रसिद्ध केलीत. या भिसी प्रकरणात शहरातील नामवंत मंडळी नोकरदार, व्यापारी, डॉक्टर, वकील मंडळींना लाखोचो चुना लावला गेल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा - ‘ते’ पाच मृतदेह पाहून गहिवरले वडगावचे अख्खे शिवार, थरथरल्या हातांनी केले सामूहिक अंत्यसंस्कार...

...आणि पायाखालची जमिन सरकली
काटोलात भिशीच्या माध्यमातून संपूर्ण फसणूकीचा व्यवहार घडला आहे. भिशी म्हटले की विना लिखापढीचा व केवळ विश्वासावर हा व्यवहार होतो. आठवडा किंवा मासिक रक्कम हप्तेवार नियमित जमा केली जाते. बोली प्रकारात रक्कम उचलून फायद्याचे वाटप होते. याच व्यवहारात आरोपी शब्बो उर्फ लादेन उर्फ रफिक मुख्तार दाऊद शेख (वय४०,रेल्वे स्टेशन काटोल) याने सुमारे शंभरावर व्यक्तींकडून वसुलीची रक्कम घेऊन शब्बो अचानक पसार झाल्याने आता भिसीवरील विश्वास उडाल्याची चर्चा रंगत आहे.

अधिक माहितीसाठी - ...आणि बहिणींची इच्छा अपूर्णच राहिली, भावावर काळाचा घाला; अपघातात अकाळी मृत्यू

लॉकडाउन ठरले निमित्त व संधी
आरोपी काटोलचा असल्याने मोठ्या प्रमाणात भिशीचा व्यवसाय गेल्या तीन ते चार वर्षांपासून चढतीवर होता. लाखोंची उलाढाल होत होती. यात कोरोना संकट आले आणि व्यवहार अनियमित होऊ लागले. आरोपी नियमित वसुली करीत होता. पण कोरोनाचा चार महिन्याचा काळ त्याच्या मना लोभ निर्माण होण्यास कारणीभूत ठरला असल्याचे पीडितांनी सांगितले. वसुली होऊन ज्यांना रक्कम देणे होते, ते कोरोनामुळे वसुली नसल्याचे निमित्त करून भिसीधारकांची वेळ काढून घ्यायचे. यात काहींनी थोडे पैसे देऊन धनादेश दिले. ते न वटल्याने संपर्क होत नसल्याने गुंतवणूकदारांच्या मनात शंका वाढली. कालांतराने लाखोंची फसवणूक झाल्याचे उघड झाले. तोपर्यत शब्बो भिशीधारकांना लाखोंचा चुना लावून फरार झाला, यावर शिक्कामोर्तब झाले.

 संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shabbo alias bin Laden is wanted by the Katol police