
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज्याच्या उपराजधानीत "सेनापती' नसल्याने चाचपडते आहे. जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधवांचे अधिकार गोठवण्यात आले आहेत, तर खंडणी प्रकरणाचे शिंतोडे आपल्या अंगावर उडू नयेत याकरिता इतर नेत्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे.
खंडणीबहाद्दरांना बेड्या ठोकल्याने एरवी ऊठसूठ कुठलाही विषय घेऊन आंदोलन करणाऱ्या मावळ्यांनीसुद्धा तलवारी म्यान केल्या आहेत. परिणामी, आधीच नागपुरात फारसा प्रभाव नसलेल्या अलीकडे शिवसेनेला राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळाले असले, तरी त्या पक्षाला वैभव प्राप्त होण्याची चिन्हे दृष्टिपथात नाहीत.
उपराजधानीत शिवसेनेला चांगले दिवस यायचे असतील, तर "नवा गडी, नवा राज' या पद्धतीनेच या पक्षाला मांडणी करावी लागणार आहे. तसे झाले, तरच पक्षाला नागपुरात आणि विदर्भात भविष्य आहे, अशी भावना जुने-जाणते शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. खंडणी प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरप्रमुख मंगेश कडवची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
युवासेनेचा प्रमुख विक्रम राठोड व त्याचा भाऊ शिवसेनेचा पदाधिकारी संजोग राठोडवर एका व्यापाऱ्याला लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोघांनाही पक्षातून काढण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालक या नात्याने प्रकाश जाधव यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याही पदाला स्थगिती देण्यात आली आहे. कडव आणि राठोड पक्षाचे पदाधिकारी होते. मात्र, त्यांच्या कृत्याशी पक्षाचा संबंध नाही, असे सांगून संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर यांनी हात झटकले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहावे, असा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने दुसऱ्यांदा निवडून आले. सुमारे 12 वर्षांपासून ते सेनेत असले, तरी त्यांचे शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत फारसे सूर जुळले नाहीत. त्यामुळे आपण बरे नि आपला मतदारसंघ बरा, असे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. ते आपल्या मतदारांच्या सतत संपर्कात असतात.
रामटेकमधून विधानसभेच्या निवडणुकीत ऍड. आशीष जयस्वाल यांनी बंडखोरी केली होती. ते निवडूनसुद्धा आले आणि शिवसेनेत दाखलही झालेत. मात्र, तेव्हापासून ते संघटनेपासून थोडे लांबच आहेत. यवतमाळचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यारूपाने शिवसेनेला आणखी एक नेता लाभला. मात्र, शिवसेनेत ते अलीकडेच आले आहेत. त्यांची पार्श्वभूमी कॉंग्रेसची आहे. त्यांची पाळेमुळे पक्षात अद्याप रुजायची आहेत.
त्यांच्याकडे नेतृत्व जाऊ नये याकरिता मराठी-अमराठी वाद मध्यंतरी उकरून काढण्यात आला होता. संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर यांनीच या वादाविषयी वक्तव्य केले. दुष्यंत चतुर्वेदी यांच्याकडे क्षमता आहे. पण, ते अद्याप अपेक्षेप्रमाणे सक्रिय झालेले नाहीत. किरण पांडव फक्त विधानसभा निवडणुकीच्या वेळीच पक्षात सक्रिय होतात. साडेचार वर्षे ते "नॉट रिचेबल' असतात. किशोर कुमेरिया यांनी महापालिकेत शिवसेनेला जिवंत ठेवले आहे. मात्र, त्यांची सुभेदारी दक्षिण नागपूरपर्यंतच मर्यादित आहे. दोनदा विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन बाहेर पडलेले आणि पुन्हा शिवसेनेत दाखल झालेले माजी उपमहापौर शेखर सावरबांधे अद्यापही सक्रिय झाले नाहीत.
कोरी पाटी असलेला नेता हवा
माजी जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांनी "वेट अँड वॉच'ची भूमिका स्वीकारली आहे. प्रकाश जाधव माजी खासदार आहेत. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. निष्ठावंत व आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबईतील बड्या नेत्यांसोबत ते संपर्क ठेवून आहेत. जुने कार्यकर्ते व नेत्यांना त्यांनी पुन्हा संधी दिली. वॉर्डप्रमुख नेमले. जबाबदाऱ्या सोपवल्या. मात्र, जिल्हाध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेत पुन्हा जीव ओतण्यात जाधवांनाही अपेक्षित यश लाभले नाही. त्यात खंडणीसारखी प्रकरणे घडल्याने आपल्या पक्षाला कोरी पाटी असलेला नेता मिळाला, तरच काही खरे आहे, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.
(संपादन : प्रशांत राॅय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.