नियुक्तीचे खोटे पत्र देऊन लाटले लाखो रुपये, नोकरीवर  गेल्यावर प्रकार उघडकीस

Wednesday, 7 October 2020

आरोपींची भेट नागपुरातील दीक्षाभूमीसमोरील आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली. त्यावेळी आरोपींनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आशिष ऊर्फ सोनू मून (वय ३२, रा. थॉयराईड केअर पॅथॉलॉजी, वर्धा), दर्शन कोटमवार (वय ३८ रा. नेताजी चौक, बाबुपेठ, चंद्रपूर), हरीश उरकुडे (वय ३५), गायकवाड नावाची मॅडम आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल रामकृष्ण लेंदे (वय २९, रा. श्रीराम वाॅर्ड महादेव मंदिरजवळ चंद्रपूर) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधिक वाचा - निष्काळजीपणाचा कळस! पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही नेले घरी; दुसऱ्या दिवशी मृत्यू होताच पत्नीविरुद्ध गुन्हा
 

आरोपींची भेट नागपुरातील दीक्षाभूमीसमोरील आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली. त्यावेळी आरोपींनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नोकरीचे आमिष दाखवून १२ लाख रुपये मागितले. आरोपींनी संगनमताने त्याला बनावट नियुक्तीपत्रही दिले. 

तो आरोग्य उपसंचालक कार्यालयात गेला असता ते बनावट असल्याचे समोर आले. तसेच मेडिकलच्या नावानेही बनावट नियुक्तीपत्र दिले. डोळे उघडल्यानंतर राहुलने पोलिसांत तक्रार दिली. बजाजनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: showing the lure of a job Fraud of young man