Diwali Festival 2020 : दिवाळीत फटाके फोडा अन् होईल बीजांकुर; कानठळ्याही बसणार नाही

प्रमोद काळबांडे
Friday, 13 November 2020

निसर्गाच्या अधिक जवळ जावे लागेल. तरच जीवसृष्टी तरेल, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत फटाक्यांनी होणारा ऱ्हास टाळण्यासाठी आणि सजीव सृष्टीला लाभकारक ठरतील अशा वनस्पतींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे फटाके तयार केले आहेत. बारूद नही बीज चाहिए, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.

नागपूर : दिवाळी हा प्रकाशाचा सण मानला जातो. परंतु, आपण फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदूषण करतो. अचानक स्फोट झाल्यामुळे गंभीर इजाही होते. दृष्टी सुद्धा अधू होऊ शकते. मात्र, श्वेता भट्टड यांनी यावर एक अचूक उपाय शोधून काढला आहे. तुमची फटाक्याची हौस त्या पूर्ण करतील. परंतु, न फुटणाऱ्या फटाक्यांनी. यामुळे धुडूम आवाजाने कानठळ्याही बसणार नाही आणि त्यातून बीज अंकुर शकते गडेहो...

श्वेता भट्टड या सामाजिक भान असलेल्या कलावंत आहेत. मध्यप्रदेशातील पारडसिंगा येथे त्यांची ग्राम आर्ट संस्था आहे. गेल्या वर्षी त्यांनी विविध वनस्पतींचे बी असलेल्या राख्या बनविल्या. ३० हजार राख्या हातोहात विकल्या गेल्या. बियांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उपक्रम यंदा फटाके आणि मिठाईपर्यंत पोहोचला आहे. याचा स्फोट होणार नाही. ते फुटणार नाहीत. उलट त्यातून बीज अंकुर होईल.

सविस्तर वाचा - बाप रे बाप! बाजारात आली २४ कॅरेट अस्सल सोन्याची मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क

फटाके आणि मिठाई बनविण्यासाठी त्या रद्दी पेपरचा उपयोग करतात. म्हणजे रद्दीची विल्हेवाट लागते. यंदा त्यांनी सात प्रकारचे फटाके, तर चार प्रकारच्या मिठाई तयार केल्या. त्यात त्या बी टाकतात. अंबाडी, तिखाडीसारख्या भाजीपाल्याच्या बिया, सोनपत्तीच्या किंवा आणखी मोठ्या झाडांच्या बिया.

अशा २३ प्रकारच्या बियांचा वापर त्यांनी केला आहे. हजारो फटाके आणि मिठाई तयार करणे सुरू केले आहे. यात त्या भागातील शंभराहून जास्त शेतकरी आणि शेतमजूर महिलांना काम मिळाले आहे.

फटाके आपले पर्यावरण आणि पर्यायाने सजीवांसाठी घातक आहेत. तसेच दिवाळीच्या काळात मिठाईत जे घटक वापरले जातात तेही शरीरासाठी विषारी असतात, असे त्या मानतात. कोरोनानंतर जगाची जीवनशैली पूर्णतः बदलावी लागेल.

अधिक माहितीसाठी - लाचखोर स्वीय सहायकाकडे आढळली लाखोंची कॅश; एसीबीची कारवाई

निसर्गाच्या अधिक जवळ जावे लागेल. तरच जीवसृष्टी तरेल, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत फटाक्यांनी होणारा ऱ्हास टाळण्यासाठी आणि सजीव सृष्टीला लाभकारक ठरतील अशा वनस्पतींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे फटाके तयार केले आहेत. बारूद नही बीज चाहिए, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.

निसर्ग जपण्याची कृतीयुक्त सवय लावा

तुमच्या मुलाबाळांना इजा होणार नाही, अशी दिवाळी साजरी करा. त्यांना निसर्ग जपण्याची कृतीयुक्त सवय लावा, असे आवाहनही श्वेता भट्टड यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कलेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी स्वतः शेती करत शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या श्वेता भट्टडसारख्या स्वयंसिद्धा खऱ्या अर्थाने पूज्यनीय ठरतात.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shweta Bhattads eco-friendly firecrackers and sweets