तुकाराम मुंढेंच्या अटकेची मागणी करणे आमदारांना भोवले; यांनी घेतला खरपूस समाचार... 

social media users attacks MLA Krishna Khopade for criticizing Tukaram Mundhe
social media users attacks MLA Krishna Khopade for criticizing Tukaram Mundhe

नागपूर : नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केले होते. त्यांचे हे विधान मुंढे समर्थकांच्या चांगलेच जिव्हारी लागले असून, त्यावरून मुंढेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आमदार खोपडेंवर चांगलेच तोंडसुख घेतले. काहींनी तर शिवराळ भाषेचा देखील वापर केला. विशेष म्हणजे या विषयात एकही कमेंट आमदार खोपडेंच्या बाजूने नव्हती. मुंढे यांना अटक करायला दम लागतो, असे आव्हानही मुंढे यांच्या समर्थकांनी आमदार खोपडे यांना दिले. 

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओपदावरून येथे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या चांगलाच वाद सुरू आहे. प्रवीण परदेशी यांनी तुकाराम मुंढे स्मार्ट सिटीचे सीईओ नव्हतेच, असे म्हणत या वादावर पडदा टाकला. आयुक्तांनी सीईओपद बेकायदेशीररीत्या बळकावले होते. त्याविरोधात महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिस ठाण्यात आयुक्तांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता तुकाराम मुंढे यांना अटक करावी, अशी मागणी आमदार खोपडे यांनी केली. त्यावरून नेटकऱ्यांनी आमदार खोपडेंचा समाचार घेतला. 

मुंढेंच्या समर्थनार्थ नेटकरी म्हणाले, दम लागतो मुंढे साहेबांना अटक करायला, भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ आहेत मुंढे, मुंढेंना हात लावाल तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, जनतेच्या मनावर राज्य करणारे अधिकारी आहेत मुंढे, मुंढे साहेबांसारखे देशात फक्त 100 अधिकारी पाहिजेत, महाराष्ट्र सरकारने मुंढे साहेबांना कायदेशीर आधार द्यावा, हिंमत असेल तर ट्राय करून बघा, मुंढे साहेबांना हात लागला तर महाराष्ट्रात तांडव होईल, या आणि अशा शेकडो कमेंट आयुक्तांच्या समर्थनार्थ केल्या आहेत. यावरून तुकाराम मुंढेंचे समर्थक राज्यभरात किती आहेत, याची कल्पना यावी. याशिवाय नागपुरातही मुंढेंच्या समर्थनार्थ काही लोकांनी रस्त्यावर येण्याची तयारी चालवली आहे. यापुढे मुंढे यांच्या विरोधात बोलणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी तोंड सांभाळूनच बोलावे, असाही सूर नेटकऱ्यांचा होता. 

स्मार्ट सिटीच्या बैठकीचे निमंत्रण आमदार खोपडेंना देण्यात आले नव्हते. त्यामुळे ते मुंढे यांच्यावर तसेही चिडून असल्याचेही सांगण्यात आले. त्यांनी अध्यक्ष प्रवीण परदेशींना याबाबत पत्रही पाठविले होते. बैठकीत प्रत्येक गोष्ट आयुक्त मुंढे यांच्या विरोधात गेली आणि यापुढे ते सीईओ नसतील, तर फक्त समन्वयकाची भूमिका बजावतील, असा निर्णय झाला. त्यामुळे आमदार खोपडेंनी उपरोक्त मागणी केली. पण, या मागणीचे पडसाद असेही उमटतील, असे कदाचित त्यांनाही वाटले नसावे. महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आमदार खोपडे आयुक्त मुंढेंच्या बाबतीत काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com