अडीच हजार मेगावॅट क्षमतेचा संयुक्त सौरऊर्जा प्रकल्प लवकरच, प्रकल्पासाठी सुरू जागेचा शोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

डॉ. राऊत यांनी गुरुवारी नागपूरच्या विद्युत भवन येथून व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे महानिर्मिती व एनटीपीसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत हे आदेश दिले. एनटीपीसीने सौर प्रकल्प साकारण्याची उत्सुकता दाखवली आहे.

नागपूर : दिवसेंदिवस वीजेची वाढती गरज पाहता अधिक प्रमाणात वीज निर्मिती गरजेची आहे. त्यासाठी शासनाचा नैसर्गिक स्रोतांकडे वळण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातूनच महानिर्मिती आणि एनटीपीसी संयुक्तरित्या अडीच हजार मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प साकारणार आहे. त्यासाठी जागा शोधून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

डॉ. राऊत यांनी गुरुवारी नागपूरच्या विद्युत भवन येथून व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे महानिर्मिती व एनटीपीसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत हे आदेश दिले. एनटीपीसीने सौर प्रकल्प साकारण्याची उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीकडून या प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला जाणार असून सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण, महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न करावे,
सौरऊर्जा, पवनऊर्जा, घन कचऱ्यापासून वीजनिर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पाकडे सर्वांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे. सौर आणि पवनऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय, यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार करण्याचा सल्ला डॉ. राऊत यांनी दिला.

सविस्तर वाचा - कोण म्हणतय, चीनवर बहिष्कार टाका, वाचा

अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील अंतीम टप्प्यात असणारा 16 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प तसेच नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 250 मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. दोंडाईच्या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली. बैठकीला प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालिका शैला ए., महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) थंगपांडियन, हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजकुमार तासकर, मिलिंद नातू, राजेश पाटील, नागपूरचे प्रादेशिक संचालक महावितरण सुहास रंगारी सहभागी झाले होते.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar power project by NTPC & Mahavitaran