फक्त १८ क्ष-किरण प्रयोगशाळा सहाय्यकांना पदोन्नती, उर्वरीत प्रतीक्षेतच

some laboratory attendant still wait for promotion in gmc nagpur
some laboratory attendant still wait for promotion in gmc nagpur

नागपूर : कोरोना संशयित असो की, पॉझिटिव्ह त्यांना एक्स रे आवश्यक आहे. यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'एक्‍स रे' विभागात तंत्रज्ञांवर प्रचंड भार आहे. यामुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने या विभागातील क्ष-किरण सहाय्यकांसह प्रयोगशाळा सहाय्यक यांना पदोन्नती देऊन दिवाळी भेट दिली. मात्र, पदोन्नतीची भेट देताना वैद्यकीय संचालनालयाने पक्षपाती धोरण राबवले असल्याचे बोलले जात आहे. १३१ प्रयोगशाळा सहाय्यकांना पदोन्नती देण्यात आली. मात्र, क्ष-किरण सहाय्यकांवर अन्याय करीत केवळ १८ जणांना पदोन्नती देण्यात आली. विशेष असे की, राज्यात सर्वच रुग्णालयात मोठ्या संख्येने क्ष-किरण सहाय्यक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

कोरोना काळात 'सकाळ'ने क्ष-किरण तंत्रज्ञांची रिक्त पदे भरताना पदोन्नतीचे धोरण राबवावे या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. कोरोनामुळे क्ष-किरण सहाय्यकांवर कोरोनाबाधितांचे एक्स रे काढण्याचा अतिरिक्त भार आहे. किरणोत्सर्गाच्या संपर्कात सहाय्यक असतात. यामुळे कोरोनाची लागण होण्याची भीती आहेच. परंतु, सातत्याने किरणोत्सर्गाच्या (रेडिएशन) संपर्कात राहिल्याने कर्करोग, क्षयरोगासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. त्यात कोरोनाच्या सावटाखाली सहाय्यक काम करीत असताना राज्यभरातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त एक्स रे तंत्रज्ञांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे एक्‍स रे, सीटी स्कॅन काढण्यासाठी कोरोनाबाधितांना तास दोन तासांची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे एकूणच क्ष-किरण सहाय्यकांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी क्ष-किरण तंत्रज्ञ संघटनेने केली होती.  

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे १०० पेक्षा अधिक एक्स रे विभागात क्ष-किरण सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. मागील दोन दशकांपासून हे या विभागात कार्यरत असूनही त्यांना एक्स रे तंत्रज्ञ पदावर पदोन्नती दिलेली नाही. २६ जिल्ह्यात एक्स रे विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न सत्तर टक्के क्ष-किरण सहाय्यकांच्या पदोन्नतीच्या धोरणातून सुटणार होता. परंतु, केवळ ६ जिल्ह्यांतील केवळ १८ जणांना पदोन्नती देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा ठपका संघटनेतर्फे ठेवण्यात आला. १३१ प्रयोगशाळा सहायकांना पदोन्नती देऊन सरकारने पदोन्नतीच्या धोरणात पक्षपातीपणा केल्याची भावना सचिव प्रकाश गढे यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभागात एक्स रे तंत्रज्ञ प्रामाणिकपणे काम करीत आहेत. अल्प मनुष्यबळ लक्षात घेता कोरोना योद्धा म्हणून सेवा देत देत असलेल्या क्ष-किरण सहाय्यकांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी केली. सकाळने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पदोन्नती मिळाली खरी. परंतु, पदोन्नतीमध्येही पक्षपाती धोरण राबवले. केवळ १०० पेक्षा अधिक सहाय्यकांपैकी केवळ १८ सहाय्यकांना पदोन्नती देऊन इतरांवर अन्याय केला आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.
- प्रकाश गढे, सचिव, क्ष-किरण तंत्रज्ञ संघटना (महाराष्ट्र राज्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com