नृत्य, गीत , गायन आणि खवय्येगिरी, सुकून के कुछ पल...

nrutya.jpg
nrutya.jpg

नागपूर : रोजच्या रहाटगाडग्यातून दोन घटका विसावा मिळण्यासाठी माणसाला मनोरंजन गरजेचे असते. असा नृत्य गीत गायन आणि विविध कलाकृतींचा खजिना नागपुराकरांसाठी खुला होतो आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र परिसरात होणारा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा व लोकनृत्य महोत्सव यंदा 10 ते 19 जानेवारीदरम्यान होणार आहे. संपूर्ण देशात गाजलेल्या या मेळाव्यात प्रसिद्ध हस्तशिल्पकलेचे व आदिवासी कलेचे सादरीकरण होणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा - कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलीसांचा उरला नाही धाक

स्त्री सशक्‍तीकरणाचा संदेशाचा जागर व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचे आणि लोकनृत्य महोत्सवाचे उद्‌घाटन पाच स्त्रियांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र वस्त्रोद्योग निगमच्या आयुक्त माधवी खोडे, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बावनकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, नागपूर विद्यापीठाच्या फाईन आर्टस विभागाच्या प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते प्रामुख्याने उपस्थित राहतील. हा महोत्सव महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये बहुप्रतीक्षित असून, यंदा केंद्र परिसरात पारंपरिक लोककलाकारांतर्फे आकर्षक सजावट करण्यात आली असून, स्टॉल्सच्या रचनेतही आकर्षक आणि सुविधाजनक बदल करण्यात आले आहेत. हा महोत्सव 10 ते 19 जानेवारीदरम्यान दुपारी 2 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार असून, रोज सायंकाळी 6.30 वाजता लोकनृत्यांचे सादरीकरण होईल. हस्तशिल्प मेळाव्यात 150 हस्तशिल्पकार सहभागी होणार असून, तीनशेहून अधिक लोक व आदिवासी कलावंतांचा महोत्सवात सहभाग असेल. याशिवाय स्वादिष्ट व्यंजनांचे 25 स्टॉल्स मेळाव्याचे आकर्षण राहतील. यात 10 ते 14 जानेवारीदरम्यान सोंगी मुखवटे- महाराष्ट्र, रणप्पा, शंखनृत्य- ओडिशा, पहाडी नृत्य-जम्मू काश्‍मीर, रिकमपाडा- अरुणाचल प्रदेश, वीरनाट्यम, गरगलू-आंध्र प्रदेश, भोरतल-आसाम, मालवी नृत्य, मध्य प्रदेश लांगा गायन-राजस्थान, नट करतब-राजस्थान हे नृत्य सादर होतील. तर 15 ते 19 दरम्यान ठोलचोलम, संबलपुरी नृत्य, पुर्वन्तिके लोकनृत्य, गौर माडिया, बरदोई शिखला, संगराई मोंग, बोनालु, सिद्धी धमाल, नगाडा आदी विविध राज्यांतील लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

विविध राज्यातील हस्तशिल्पकार टेरा कोटा, फर्निचर, कारपेट, हॅंडलुम, ज्वेलरी, पंजाबी जुती आदी विविध प्रकार विक्रीसाठी महोत्सवात उपलब्ध राहणार असून, नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक खिरवडकर यांनी केले. याप्रसंगी उपसंचालक मोहन पारखी, केंद्राचे अधिकारी दीपक कुळकर्णी, थोरात आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com