"तुमचे लवकर आटोपा" म्हणत सभापतींनी विरोधकांना काढले कक्षाबाहेर; अखेर वऱ्‍हांड्यात घ्यावी लागली पत्रकार परिषद

Speaker gave order to opposition party members to go out
Speaker gave order to opposition party members to go out

नागपूर : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी आज समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी संवाद सुरू असताना सभापती आल्या आणि विरोधी पक्ष नेत्यांसह सदस्यांना कक्षाबाहेर काढले. या प्रकारामुळे विरोधी सदस्य संतापले. पण त्यांनी शांतता बाळगत वऱ्हांड्यात पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या घोटाळ्याबाबत माहिती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर, कैलास बरबटे, राधा अग्रवाल, व्यंकट कारेमोरे आदी उपस्थित होत. समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात कुणीच नसल्याने पत्रकार परिषद सुरू केली.

दरम्यान माटे आल्या. तुमचे लवकर आटोपा, असे त्या म्हणाल्या. थोड्या वेळा नंतर पुन्हा झाले का, असे म्हणत, कक्षा बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे विरोधकांनी कक्षातून काढता पाय घेतला. जिल्हा परिषदेच्या वऱ्‍हांड्यातच पत्रकारांना माहिती दिली. विरोधी सदस्यांना बसायलाही जागा नाही, अशी ओरड करीत, एका कक्षाचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी समाजकल्याण समिती सदस्यसुद्धा उपस्थित होते.

अध्यक्षांच्या कक्षातही अपमान

विरोधी पक्षाच्या सदस्य राधा अग्रवाल या एका कामासाठी अध्यक्षांच्या कक्षात गेल्या. अध्यक्ष नव्हत्या, पण त्यांचे पती तेथे होते. ते काही लोकांसोबत चर्चा करीत होते. त्यांच्या पतींनी महत्वाची बैठक सुरू असल्याने आपल्याला बाहेर जाण्यास सांगितले होते. या घटनेला अग्रवाल आज उजाळा दिला. अध्यक्ष नसताना त्यांच्या कक्षात त्यांचे पती बैठका कशा घेऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला.

एका कर्मचाऱ्याने उघडला कक्ष

सभापतींच्या कक्षातून विरोधक बाहेर आल्यानंतर कक्षाबाबत आरडा-ओरड केली. वऱ्‍हांड्यात पत्रकारांशी बोलताना दिसताच एका कर्मचाऱ्याने एक कक्ष उघडला. 

विरोधी पक्षांच्या सदस्यांना बसण्यासाठी जागा नाही. समाजकल्याण सभापतींच्या कक्षात कुणीच नसल्याने बसलो. जिल्हा परिषद कुणाच्या मालकीची नाही. हा सदस्यांचा अपमान आहे. त्यांच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो. विरोधकांसाठी एक कक्ष द्यावा, अशी मागणी सीईओंकडे करणार आहे.
अनिल निधान, 
विरोधी पक्ष नेता.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com