Video : विशेष विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षिका ठरतेय आशेचा किरण, ऑनलाईन क्लासेस सुरू

मंगेश गोमासे
रविवार, 14 जून 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. यामुळे घरीच व्हिडिओ आणि ऑनलाइन क्‍लासेसमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्याचे काम शाळांकडून केले जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणात दिव्यांगांना कुठलेच स्थान नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी मूकबधिर शाळेतील प्राचार्या डॉ. मीनल सांगोळे आणि त्यांच्या सहकारी शिक्षिकांनी मूकबधिर शाळेतील नववी आणि दहावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कंबर कसली.

नागपूर  : शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाण्याची भीती निर्माण झालेली असताना शिक्षणापासून मूकबधिर विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनल सांगोळे यांनी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. यामुळे घरीच व्हिडिओ आणि ऑनलाइन क्‍लासेसमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्याचे काम शाळांकडून केले जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणात दिव्यांगांना कुठलेच स्थान नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी मूकबधिर शाळेतील प्राचार्या डॉ. मीनल सांगोळे आणि त्यांच्या सहकारी शिक्षिकांनी मूकबधिर शाळेतील नववी आणि दहावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कंबर कसली.

हेही वाचा : आम्हाला नाही का ऑनलाईन शिक्षणाचा अधिकार, कुठलीही सुविधा नाही उपलब्ध

विशेष म्हणजे, मूकबधिर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अभ्यासक्रम तयार करीत, त्याद्वारे या विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून शिकवत आहेत. यासाठी "करपल्लवी' या सांकेतिक भाषेचा वापर शिक्षकांकडून करण्यात येत आहे. ऑनलाइन शिक्षणामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यासह मराठी आणि इतर विषयही त्या सहजपणे शिकवतात. एकीकडे कुठल्याही प्रकारे सरकारकडून दिव्यांगांना शिकविण्यासाठी उपक्रम वा अभ्यासक्रम नसताना, या शिक्षकांद्वारे दिव्यांगांना शिकविण्याची तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे.

अंध विद्यार्थ्यांसाठी ऑडियो क्‍लिप्स तयार करणार
मूकबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच अंध विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी डॉ. मीनल सांगोळे यांनी विविध ऑडिओ क्‍लिप्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अंध विद्यार्थ्यांना ब्रेललिपीच्या माध्यमातून शिकविण्यात येते. त्यामुळे ऑडिओ क्‍लिप्सच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सहजपणे शिकता येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For special students They are a ray of hope