विदर्भातील या  मोठ्या मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल 

राजेश चरपे
Thursday, 3 September 2020

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व मंत्री आणि संबंधितांनी कोरोनाची चाचणी करूनच यावे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. असे बंधनकारक करण्यात आले असल्याने मंत्री सुनील केदार यांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली.

नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या ते मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाच्या चाचणीत त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासले असता कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व मंत्री आणि संबंधितांनी कोरोनाची चाचणी करूनच यावे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. असे बंधनकारक करण्यात आले असल्याने मंत्री सुनील केदार यांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली. स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ब्रीच कॅन्डीचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवून आहेत. 

यानंतर त्यांची ॲन्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरील उपचाराबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यामुळे केदार अधिवेशनात सहभागी होऊ शकतील की नाही, यावरही प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
 

मंत्री केदार उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये राहतील की गृहविलगीकरणात, याबाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. पण दुसरी तपासणी झाल्यानंतर डॉक्टर याबाबत निर्णय घेतील, असे त्यांच्या निकटतम सहकाऱ्यांनी सांगितले. सुनील केदार नागपूरच्या सावनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

नागपुरात असताना ते सतत जिल्ह्याचा दौरा करीत असतात. याशिवाय अधिकाऱ्यांच्या बैठकाही ते नियमितपणे घेतात. सतत लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 

गणेशपेठ आगारात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी

 
एसटी चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांच्या हितार्थ गणेशपेठ आगारात कोरोना चाचणी केंद्र व विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय ढोके यांनी एटीचे विभग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणेशपेठेतील एस.टी विभागीय कार्यशाळेत कार्यरत यांत्रिक कर्मचाऱ्याचा २६ ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला घोषणेनुसार तातडीने आर्थिक मदत करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एसटी कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ सुरक्षेसाठी तातडीने बस डेपो परिसरातच कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी  मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports, Youth Welfare Minister Sunil Kedar infected with corona