बस झाले, आता सुरू करा! ‘आपली बस'च्या प्रतीक्षेत नागरिक; सभापतींनीही व्यक्त केली नाराजी 

राजेश प्रायकर 
Friday, 16 October 2020

अनलॉकनंतर शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, उद्योग सुरू करण्यात आले आहे. येथे काम करणाऱ्या गरीब मजूर, कर्मचारी वर्गही मोठ्या उत्साहाने कामाला लागला. परंतु या गरीब वर्गाला कामावर पोहोचण्यासाठी ऑटोवर मोठा खर्च करावा लागत आहे.

नागपूर ः कोविडच्या संक्रमणामुळे शहर बससेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता राज्य सरकारने मेट्रो सुरू करण्याचीही परवानगी दिली असून उद्यापासून नागपूरकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. परंतु अद्यापही शहर बससेवा सुरू न झाल्याने चाकरमाने, गरीब मजुरांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहर बससेवा सुरू करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. 

अनलॉकनंतर शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, उद्योग सुरू करण्यात आले आहे. येथे काम करणाऱ्या गरीब मजूर, कर्मचारी वर्गही मोठ्या उत्साहाने कामाला लागला. परंतु या गरीब वर्गाला कामावर पोहोचण्यासाठी ऑटोवर मोठा खर्च करावा लागत आहे. या गरीब वर्गाला कामावर पोहोचण्यासाठी शहर बससेवा सुरू करण्याची गरज लक्षात घेता परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आपली बस सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. 

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

समितीच्या बैठकीत बस सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु पंधरा दिवसांत मनपा प्रशासनाने आपली बस सुरू करण्याबाबत कुठलीही प्रक्रिया सुरू केली नाही. त्यामुळे सभापतींनीही नाराजी व्यक्त केली. एकीकडे पुढे दिवाळीसारखा सण असून अनेक गरीब विक्रेते बसमधूनच विक्रीसाठी साहित्य घेऊन जातात. 

अनेक नागरिकही खरेदीसाठी बसचाच वापर करतात. परंतु बस बंद असल्याने नागपूरकरांची चांगलीच फजिती होणार आहे. संपूर्ण राज्यात १०० टक्के प्रवासी क्षमतेसह राज्य परिवहन बस सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर शहरातील ‘आपली बस’ सेवा सुरू करण्यात यावी, अशी सूचनाही बोरकर यांनी प्रशासनाला केली होती. 

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

बस सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे दिली आहे. त्यानुसारच शहर बस सेवा सुरू करण्यात यावी. समितीच्या बैठकीतही या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. आता तर मेट्रो सेवाही उद्यापासून सुरू होत आहे. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, मास्क बंधनकारक करून आपली बस सुरू करावी. 
- बाल्या बोरकर,
 सभापती, परिवहन समिती.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: start city bus in nagpur soon