'मायबाप सरकार, जे सोलापुरात झाले ते नागपुरात का नाही?' मंत्र्यांना स्कूल व्हॅन चालकांचा सवाल 

नरेंद्र चोरे 
Wednesday, 28 October 2020

आपली व्यथा मांडताना संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अफसर खान, सचिव प्रकाश देवतळे व दीपक साने म्हणाले, मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यापासून स्कूल व्हॅन चालक आर्थिक संकटात आहेत

नागपूर : दररोज प्रामाणिकपणे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करून आपल्या मुलाबाळांचे पोट भरणाऱ्या उपराजधानीतील तब्बल सात हजार गोरगरीब स्कूल व्हॅन चालकांवर लॉकडाउनने उपासमारीची वेळ आणली आहे. त्यांनी आपल्या व्यथा मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांकडे मांडल्या, वारंवार निवेदने दिलीत. मात्र कुणीही त्यांच्या भावना जाणून घेतल्या नाही. अडचणीच्या काळात मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा, स्कूल व्हॅन चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्या व्यासपीठावर दिला.

आपली व्यथा मांडताना संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अफसर खान, सचिव प्रकाश देवतळे व दीपक साने म्हणाले, मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यापासून स्कूल व्हॅन चालक आर्थिक संकटात आहेत. सात महिने होऊनही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे सर्व स्कूल व्हॅन चालक घरी बसले आहेत. 

हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र

शाळा अचानक बंद झाल्यामुळे अनेक पालकांनी पैसे दिले नाहीत. हाताला कामे व उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. उपराजधानीत सात हजारांवर महिला व पुरुष स्कूल व्हॅन चालक आहेत, हे उल्लेखनीय.

ते पुढे म्हणाले, आम्ही आमच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह दुग्ध व पशू संवर्धन मंत्री सुनील केदार, गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकल्या. माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व आयुक्तांचीही भेट घेतली. 

मात्र कुणाकडूनच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या अडचणीच्या काळात शासनाकडून दरमहा किमान पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी तसेच आमच्या वाहनांवरील बँकांच्या कर्जवसुलीला (मासिक हप्ते) डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती द्यावी, अशी आमची मुख्य मागणी आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आम्हाला पोटापाण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

सोलापूरला झाले ते नागपुरात का नाही

सोलापूर येथील स्कूल व्हॅनचालकांच्या संघटनेने तेथील जिल्हाधिकाऱ्यांना वाहनांवरील बँकांच्या कर्जवसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच आदेश काढून स्कूल व्हॅनचालकांना त्रास न देण्याचे तसेच त्यांचे हप्ते तात्पुरते स्थगित करण्याचे आदेश दिले. सोलापूरचे जिल्हाधिकारी इतका चांगला निर्णय घेऊ शकतात, तर मग नागपूरचे जिल्हाधिकारी का नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नक्की वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण

व्यथा सरोज पाटील यांची...

कोरोनामुळे स्कूल व्हॅन चालकांची परिस्थिती किती कठीण आहे, याचे उत्तम उदाहरण कळमना येथील सरोज पाटील यांचे आहे. आठ वर्षांपूर्वी पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी हाती 'स्टेअरिंग' घेणाऱ्या सरोज यांचाही काही दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यात पाय फ्रॅक्चर झाल्याने त्या घराबाहेर पडू शकत नाही. त्या घरात एकट्याच कमावत्या असल्यामुळे सर्वांवरच सध्या उपासमारीची वेळ आली आहे. हे एकमेव उदाहरण नाही. शहरातील जवळपास सर्वच स्कूल व्हॅन चालकांच्या घरात हीच स्थिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State government ignoring the issues of school van drivers