लाखोंचे सागवान चोरले, वनविभाग बघतच राहिले !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

या घटनेत चोरांनी चक्क शेतमालकाच्या शेतात उभ्या असलेल्या सागवान झाडांची कत्तल करत लाकूडफाटा ट्रक भरून पसार झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.

उमरेड (जि.नागपूर) : हल्लीच्या काळात शेतकरी दुष्काळ, नापिकी आदी संकटांना तोंड देत असून त्यांना कर्जबाजारीपणामुळे कर्जाचे हप्ते भरण्याचा त्यांच्या मागे तगादा बॅंका लावत असल्यामुळे अनेकदा शेतकरी आत्महत्यासुद्धा करतात. याशिवाय शेतात ठेवलेले सोयाबीन, कापूससुद्धा चोरी गेल्याच्या घटना अनेकदा ऐकावयास मिळतात. अशीच एक घटना सोमवारी (ता. 27) भिवापूर तालुक्‍यातील चिखलापार गावात घडली. परंतु या घटनेत चोरांनी चक्क शेतमालकाच्या शेतात उभ्या असलेल्या सागवान झाडांची कत्तल करत लाकूडफाटा ट्रक भरून पसार झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.

क्‍लिक करा :  नागपूरकरांचा प्रवास सुखकर; हिंगणा मार्गावरील मेट्रोला हिरवी झेंडी

चिखलापार शिवारातील घटना

फिर्यादी रघुनाथ बकाराम नारनवरे (वय 60) हे अशिक्षित आदिवासी शेतकरी असून यांची 1.74 हेक्‍टर म्हणजे जवळपास 4 एकर जिरायती शेतजमीन वर्ग 1, 178/1/ब गट क्रमांक व उपविभाग अशा स्वरूपाची आहे. शिवाय त्यांच्या सातबारावर सेवा सहकारी संस्था पांढुर्णाच्या 2 लाख 50 हजार रुपये कर्जाचा बोजा असल्याचे दिसून येते. त्यांच्या शेतात सागाची शेकडो झाडे आहेत. त्यापैकी अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री काही झाडांची कत्तल करून गाडीतून ती पळविली. चोरीच्या घटनेबाबत गावातील काही जणांना सुगावा लागला. गावच्या पोलिस पाटलांनी सोमवारी रात्री उमरेड वनविभागाला सूचना दिली. मात्र रात्रीची वेळ असल्याने वनविभागाने टाळाटाळ केली असल्याची चर्चा आहे.
क्‍लिक करा : चोरीचा मामला; एटीएमही नेला

शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळेल का?
मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारासदेखील काही गावकऱ्यांना चोरटे शेतात झाडे कापताना आढळून आले. आरडाओरडा केल्यावर त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर पुन्हा वनविभागाला सूचना दिली. त्यानंतर दुपारी वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. या कारवाईचा तपशील जाणून घेण्यासाठी दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी वैष्णवी झरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी चोरीत कापल्या गेलेल्या सागाच्या झाडांची अधिकृत माहिती मागितली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला व आम्ही गुन्हा दाखल करून अज्ञात चोरांचा तपास घेऊ असे सांगितले. पीडित अशिक्षित शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळेल का, असा सवाल उपसरपंच, पोलिस पाटील आणि गावकरी करीत आहेत.

क्‍लिक करा:   आता लवकरच पॉर्नवर येणार निर्बंध

 

वनकर्मचारी उशीरा पोहचले
सागाच्या झाडांच्या चोरीची सूचना उमरेड वनविभागाला सोमवारी रात्री पोलिस पाटील पांडुरंग नाकाडे यांनी दिली. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा चोरटे शेतात सागाची झाडे कापताना रंगेहात पकडता आले असते. परंतु वनविभागाने बघ्याची भूमिका घेत सरळ दुर्लक्ष केले. याशिवाय मंगळवारी सकाळी सात वाजतासुद्धा चोरांना काही गावकऱ्यांनी झाडे कापताना पाहिले. आरडाओरडा करताच चोरांनी पळ काढला. वनविभागाचे कर्मचारी मात्र घटनास्थळी दुपारी दाखल झाले.
पांडुरंग घरत
उपसरपंच, चिखलापार

चोरटयांविरूद्‌ध गुन्हा दाखल
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजतादरम्यान चोरीसंदर्भातील तक्रार अर्ज आमच्याकडे सादर केला. तेव्हा काही कर्मचारी घटनास्थळी पाठवून चौकशी केली. त्यात फक्त पाच-सहा झाडे कापली असल्याचे दिसून आले. तेव्हा पंचनामा करून अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद करून तपासात घेतला. ज्यावेळी चोर शेतात दिसून आले, त्याच वेळेस शेतकऱ्यांनी चोरांना अडवून धरायला हवे होते.
वैष्णवी झरे
दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stole millions of teas, kept watching the forest department!