या चिमुकल्यांच्या कुटुंबाची कहाणी देईल तुम्हाला जगण्याचे बळ... एकदा वाचाच

रामटेक  :  बिघडलेली सायकल खांद्यावर टाकून मागे दोन चिमुकल्या बहिणी मनसर येथून सात किमीची पायपीट करून भंगारात विकण्यासाठी प्लॅस्टिक व बॉटल्स घेऊन रामटेकला आलेत.
रामटेक : बिघडलेली सायकल खांद्यावर टाकून मागे दोन चिमुकल्या बहिणी मनसर येथून सात किमीची पायपीट करून भंगारात विकण्यासाठी प्लॅस्टिक व बॉटल्स घेऊन रामटेकला आलेत.

रामटेक (जि.नागपूर)  :  "लॉकडाउन' काळात गावोगावी भटकून लोखंडी वस्तू तयार करून विकणाऱ्यांची तर मोठीच कुचंबणा होते आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या चिमुकल्या मुलांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. उपाशी आईवडीलांची स्थिती पाहून त्यांची व्यवस्था करण्यासाठी लॉकडाउनमध्ये या चिमूकल्यांनी पायपीट केली. वाइल्ड चॅलेंजर्स ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी त्यांच्या पालकांना जीवनावश्‍यक वस्तू देऊन परत मदतीचे आश्वासन दिले.

कामधंदे बंद पडल्याचा फटका
शनिवारी दुपारी एकच्या सुमारास रणरणत्या उन्हात दोन मुली व लहानशी सायकल डोक्‍यावर घेतलेला मुलगा रामटेक बसस्थानकाजवळील नाकाबंदी असलेल्या ठिकाणी आले. गलितगात्र असलेल्या त्या मुलांची पोलिसांसह स्वयंसेवक म्हणून असलेल्या वाइल्ड चॅलेंजर्सच्या राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे यांनी दरडावून "कुठे चालला आहात? काय काम आहे? अशी विचारणा केली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून कर्तव्यावर असलेले सर्वचजण स्तंभित झाले. ती लहान मुले मनसर येथून गोळा केलेल्या रिकाम्या शिश्‍या (बॉटल्स), प्लॅस्टिक घेऊन भंगारवाल्याकडे विकण्यासाठी आले होते.

त्यांच्याजवळ एक लहानशी सायकल होती. मात्र, येत असताना सायकलची चैन तुटली. जवळ छदाम नाही की, कुठे सायकलचे दुकान नाही. त्यांच्यापैकी वयाने थोडा मोठा असलेल्या मुलाने सायकल डोक्‍यावर घेतली व पायीच ते 7 किलोमीटर अंतर कापून रामटेकपर्यंत आले होते. ते भटक्‍या लोहार काम करणाऱ्या कुटुंबातील होते. त्यांचे आईवडील लोखंडाच्या वस्तू तयार करून विकून आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. गेल्या 15 दिवसांपासून देशभरात लॉकडाउन असल्यामुळे त्यांची कामे बंद आहेत.

आईवडिलांजवळ पैसे नाहीत. तेव्हा त्या चिमुकल्यांनी मनसरमध्ये फिरून काचेच्या रिकाम्या बॉटल्स गोळा केल्यात. प्लॅस्टिक गोळा केले. मनसरमधील भंगार घेणाऱ्यांची दुकाने बंद असल्याने त्यांनी रामटेकला जाण्याचा निर्णय घेतला.


दात आहे तर चने नाही !
आईवडिलांना न सांगता दोन चिमुकल्या व त्यांचा मोठा भाऊ (अंदाजे 8 वर्ष) लहानशा सायकलने रामटेककडे निघाले. मध्येच त्यांच्या सायकलची चेन तुटली. आता काय करावे? जवळ पैसेही नाही अन्‌ रस्त्यात कुठे दुकान नाही. त्यामुळे मुलाने सायकल डोक्‍यावर घेतली व रामटेकला आले. तुम्ही काही खाल्ले आहे काय, अशी त्यांना विचारणा केली असता त्यांनी नाही म्हटले. राहुल कोठेकर यांनी त्यांना पैसे देऊ केले, तर त्यांनी नकार दिला. मग कसेतरी समजावून त्यांना चहा व बिस्किटे खाऊ घातली व एका कारमधून त्यांना मनसरपर्यंत घरी सोडण्यात आले.

लोहार कुटुंबीय विवंचनेत
इकडे आईवडील या तिघांनाही शोधत होते. मनसर येथील उड्डाणपुलाजवळ या लोहार कुटुंबीय पाल लावून राहात होते. त्यांच्या आईवडिलांनी तहसील कार्यालयातून एकदाच पाच-पाच किलो धान्य भेटल्याचे सांगितले. मात्र, जवळ पैसा नसल्याने काय करावे, अशा विवंचनेत ही कुटुंबे होती. त्यांच्यापासूनच थोडे दूर पुन्हा पाल ठोकून काही कुटुंब राहात असलेली दिसलीत. त्यांची विचारपूस केली असता, ती कुटुंबे लहान मुलांसाठीच्या कागदी भिंगरी, छोटे डमरू बनवून विकणाऱ्यांची होती. त्यांचीही अवस्था अशीच होती. त्यांची अगतिकता डोक्‍यात घेऊनच वाइल्ड चॅलेंजर्सचे सदस्य रामटेकला आले. त्यांनी 20 कुटुंबांना पुरेसे होईल, अशा साहित्यांची जुळवाजुळव केली.

सहायक पोलिस निरीक्षक दत्ताप्रसाद शेंडगे यांनी रोख मदत तर शुभम सावरकर यांनी लहान मुलांसाठी बिस्किट पुडे दिले. आज ही सर्व मदत मनसर येथे जाऊन उपनिरीक्षक मीना बारंगे, राहुल कोठेकर, अजय मेहरकुळे व इतरांनी त्या कुटुंबांना दिली. आज मोलमजुरी करणाऱ्यांची अवस्था अशीच आहे. काही जणांना धान्य तर भेटले आहे; पण ते कोरडे कसे खाणार? अशा कुटुंबांचा विचार झाला पाहिजे. ज्यांची दान करण्याची इच्छा आहे, ऐपत आहे त्यांनी अशा कुटुंबांची मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com